अक्कलकारा
या वनस्पतीच्या नावातच तिचे गुणधर्म सामावलेले आहेत. मुलांना लहानपणी वडीलधारी माणसे अक्कलकारा तूप-भातात मिसळून खायला देत असत. मुलांनी लवकर बोलावे, स्पष्ट बोलावे यासाठी ते देत. लहान मुले बोलायला शिकताना सुरुवातीला बोबडे बोलतात. पहिल्या-पहिल्यांदा या बोबड्या बोलांचे कौतुक होते. मात्र काही काही वेळा मुलाचे वय वाढत जाते, पण त्याची बोबडे बोलायची सवय काही जात नाही. अशावेळी मुलांचे शब्दोच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून त्यांना अक्कलकारा खायला देतात. अक्कलकारा हा जिभेला चुरचुरणारा, किंचित तिखट असल्याने लहान मुले लवकर खात नाहीत. अशा वेळी युक्ती प्रयुक्तीने भातात मिसळून तूप मीठ टाकून अक्कलकारा नियमित खायला द्यावा. याच्या सेवनाने आवाज चांगला, शब्दोच्चार स्पष्ट, बुद्धी तल्लख होते. विविध मानसिक आजारांवर अक्कलका-याचा खूप चांगला उपयोग होतो. उन्माद, अपस्मार यासारख्या मानसिक आजारांवर याचा चांगला उपयोग होतो. ...