हिवाळ्यातील आरोग्य
हेमंत आणि शिशिर ऋतु मिळून हिवाळा हा ऋतु तयार होतो. या ऋतूत सूर्य दक्षिण ध्रुवाकडे सरकतो. म्हणजेच दक्षिणायन होते. दिवस लहान तर रात्र मोठी असते. आयुर्वेदानुसार हा काळ ’विसर्गकाळ’ असतो. म्हणजे या काळात निसर्गाकडून प्राणिमात्राला बल प्राप्त होत असते. दिवसभर सूर्यप्रकाश असला तरी वातावरणात गारवा असल्याने प्रफुल्लित आणि उत्साही वाटते. सर्व प्रकारची कामे करण्यास उत्साह वाटतो. रात्री मात्र गारठा असल्याने ऊबदार पांघरूणात पडून रहावेसे वाटते. आयुर्वेदानुसार हिवाळा हा बलदायक, आरोग्यकारक काळ सांगितलेला आहे. शिशिर ऋतूत वातावरणात रुक्षता जास्त वाढते. झाडांची पाने गळतात. शिशिर ऋतूत ’पानगळ’ सुरु होते. त्यामुळे सर्व वृक्ष, लता, वेली, झुडुपे, एकूणच सर्व सृष्टी ओकीबोकी आणि निस्तेज दिसू लागते. हिवाळ्यात शरीराची बाहेरची ऊष्णता कमी होते. त्यामुळे जाठराग्नी चांगलाच प्रदीप्त होतो. म्हणून हिवाळ्यात भरपूर भूक लागते. म्हणून या ऋतूत दोन्ही वेळा भरपूर प्रमाणात आहार घ्यावा. गोड, आंबट पदार्थांचे आहारात जास्त प्रमाण ठेवावे. अर्थात स्वत:ची प्रकृतीचा आणि आज...