मेथी
मेथीची पालेभाजी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे उत्पादन खूप होते. तसेच मेथीचे बी बाजारात मिळते. या मेथीच्या बीपासून मेथीचे लाडू तयार करतात. हे लाडू हिवाळ्यात, हेमंत, शिशिर ऋतूत खातात. मेथीचे लाडू अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक असतात. मेथीची भाजीसुद्धा अतिशय पौष्टिक असते. तुरीच्या डाळीबरोबर मेथीचे दाणे एकत्र करून त्याचे कालवण करतात. त्याला 'पेंडपालं' असे म्हणतात. बाळन्तिणीला डिंकाचे, मेथीचे लाडू खायला देतात. प्रसूतीकाळात झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी हा आहार देतात. मेथीमुळे बाळन्तिणीच्या अंगावरचे दूधसुद्धा वाढते. तसेच गर्भाशय शोधन होते. प्रसूतीकाळात गर्भाशयात साचलेल्या, साठलेल्या दोषांचा निचरा करण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. मेथीच्या बिया शरीरातील अतिरिक्त मेद कमी करतात. बियांचे चूर्ण नियमित घेतल्यास मेद कमी होतो. प्रमेहावर मेथीच्या बियांचा चांगला उपयोग होतो. रक्तातील साखर वाढणे, वारंवार लघवीला जावे लागणे, बैठ्या जीवनशैलीमुळे होणारा मधुमेह (टाईप २) यावर दाणामेथीचा चांगला उपयोग होतो...