बहावा
मंडळी, बरेच दिवसांनी आपली भेट होतेय. ह्या रखरखीत उन्हाळ्यात झाडे सुकलेली असताना गुलमोहोर, बहावा ही झाडे मात्र खूप फुललेली असतात. बहावा उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी फुलतो. काही ठिकाणी बहाव्याच्या फुलांची भाजी करतात. याला फळे म्हणजे शेंगा येतात. शेंग चांगली जाड लाटण्यासारखी असते. शेंगेत बिया व मगज असतो. बहाव्याच्या मगजाचा खूप औषधी उपयोग आहे. मगज सौम्य रेचक आहे. बहावा मगज हा दुधात कोळून साखर घालून रात्री घेतल्यास दुस-या दिवशी शौचास साफ होते. जुलाब मात्र होत नाहीत. कोणत्याही वयाच्या माणसास शौचास साफ होण्यासाठी मगज वापरतात. यापासून तयार केलेल्या आरग्वध कपिला वटीचा उपयोग सौम्य रेचनासाठी उत्तम होतो. गोड, थंड असल्यामुळे पित्तदोषावर खूप उपयुक्त आहे. यकृताच्या कार्याला मगजाच्या सेवनाने उत्तेजना मिळते. बियांचे चूर्ण मधुमेहवर उपयुक्त आहे. त्वचारोगांवर बहाव्याच्या पानांचा उपयोग होतो. बहाव्याचा कोवळा पाला वाटून त्वचारोगांवर लावावा. फुललेल्या बहाव्याचे फोटो खूप छान येतात.