वसंत ऋतूतील प्रकृतीची काळजी
मंडळी, खास आग्रहास्तव ही पोस्ट पुन्हा देत आहोत. वसंत ऋतु म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. सूर्याचे उत्तरायण हळूहळू या ऋतूत सुरु होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढते. शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते. वातावरणात थोडीशी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नविन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित, नवचैतन्याने नटलेली भासते. आंब्याला मोहोर येतो. सर्वत्र सुगंधित फुले फुलतात. कोकीळा कुहु कुहु कुंजन करु लागते. अशा प्रकारे सर्व सृष्टीला नवसंजीवन देणारा हा वसंत ऋतु म्हणजे ’ऋतुराज वसंत’ सुरु होतो. वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे हिवाळ्यात निसर्गत: आणि आहार-विहारामुळे संचित झालेला कफदोष द्रवीभूत होतो, त्याचे विलयन होते. त्यामुळे या ऋतूत कफदोषाचे अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: श्वसनमार्गाचे व्याधी जास्त होतात. उदा. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखेही व्याधी होतात. या ऋतूत भुकेचे प्रम...