हिवाळ्यातील आरोग्य


               हेमंत आणि शिशिर ऋतु मिळून हिवाळा हा ऋतु तयार होतो. या ऋतूत सूर्य दक्षिण ध्रुवाकडे सरकतो. म्हणजेच दक्षिणायन होते. दिवस लहान तर रात्र मोठी असते. आयुर्वेदानुसार हा काळ ’विसर्गकाळ’ असतो. म्हणजे या काळात निसर्गाकडून प्राणिमात्राला बल प्राप्त होत असते. दिवसभर सूर्यप्रकाश असला तरी वातावरणात गारवा असल्याने प्रफुल्लित आणि उत्साही वाटते. सर्व प्रकारची कामे करण्यास उत्साह वाटतो. रात्री मात्र गारठा असल्याने ऊबदार पांघरूणात पडून रहावेसे वाटते. आयुर्वेदानुसार हिवाळा हा बलदायक, आरोग्यकारक काळ सांगितलेला आहे. शिशिर ऋतूत वातावरणात रुक्षता जास्त वाढते. झाडांची पाने गळतात. शिशिर ऋतूत ’पानगळ’ सुरु होते. त्यामुळे सर्व वृक्ष, लता, वेली, झुडुपे, एकूणच सर्व सृष्टी ओकीबोकी आणि निस्तेज दिसू लागते. 
हिवाळ्यात शरीराची बाहेरची ऊष्णता कमी होते. त्यामुळे जाठराग्नी चांगलाच प्रदीप्त होतो. म्हणून हिवाळ्यात भरपूर भूक लागते. म्हणून या ऋतूत दोन्ही वेळा भरपूर प्रमाणात आहार घ्यावा. गोड, आंबट पदार्थांचे आहारात जास्त प्रमाण ठेवावे. अर्थात स्वत:ची प्रकृतीचा आणि आजारांचा विचार करावा. तसेच विशिष्ट रोगांमध्ये जे पथ्यापथ्य सुचविले असेल त्याचेही पालन करावे. 
चांगले तूप, तेल यांचा आहारात भरपूर वापर करावा. या ऋतूत दिवाळी हा सण म्हणूनच येतो. दिवाळीच्या निमित्ताने गोड, तळलेले चमचमीत पदार्थ, विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ केले जातात ते वाढलेल्या जाठराग्नीचे शमन करण्यासाठीच. सकाळच्या वेळी भरपेट न्याहारी करावी. या ऋतूत कोणतेही पदार्थ निषिद्ध सांगितलेले नाहीत. सर्व प्रकारचा आहार पचविण्यास जाठराग्नी समर्थ असतो. गहू, उडीद, तांदूळ, साखर, गूळ, दूध, तेल, तूप यांचा आहारात भरपूर वापर करावा. मूग, तूर, हरभरा, कुळीथ, इतर कडधान्ये यांचाही आहारात भरपूर वापर करावा. कांदे, वांगे, लसूण, बटाटा, मेथी, पालक, शेपू इतर पालेभाज्या यांचाही भरपूर वापर करावा. मांसाहारी व्यक्तींनी सर्व प्रकारचा मांसाहार करावा. मासाचे विविध पदार्थ, मासे, अंडी, त्यांचे पदार्थ भरपूर खावे. लोणी, दूध, तूप, मलई, यांचा भरपूर वापर करावा. केळी, द्राक्षे, सफरचंद, बदाम, पिस्ता, अक्रोड, जरदाळू, बोरे, आवळे, डाळींब, खजूर यासारखी फळे भरपूर खावीत. आवळे अष्टमीच्या दिवशी आवळ्याचे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. च्यवनप्राश, मोरावळा हे या ऋतूत नियमित घ्यावेत. या ऋतूत डिंक, साजूक तूप, मेथीचे बी, खोबरे, खसखस, साखर, गूळ यापासून डिंकाचे लाडू करतात. हे बलदायक, पौष्टीक असतात. मुगाचे पीठ, तूप, साखर किंवा गूळ यापासून मुगाचे लाडू करतात.  हेही पौष्टीक, शक्तीवर्धक आहेत. असे डिंकाचे, मुगाचे लाडू शक्ती, मांसवर्धनासाठी खावेत. पट्टीच्या खवैय्यांना हा ऋतू म्हणजे वरदानच आहे. 
या ऋतूत धनुर्मास किंवा धुंधुरमास येतो. त्या काळात पहाटेच्या वेळी नैविद्य दाखवून जेवण घेण्याची प्रथा आहे. मुगाची खिचडी, कढी, बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत, तूप असा चविष्ट बेत या दिवसात करतात. सकाळी सकाळी भरपेट जेवण व्हावे असा हेतू त्यामागे आहे. 
याच ऋतूत मकरसंक्रांत येते. तीळ, गूळ, गुळाची पोळी असे पौष्टीक, ऊष्ण, स्निग्ध पदार्थ मकरसंक्रांत, गणेश जयंती या निमित्ताने आहारात यावेत असा आयुर्वेदाचा शास्त्रीय दृष्टीकोन आहे. एकूणच भारतीय संस्कृतीत सण, रूढी ह्या हवामानाचा आणि ऋतूंचा विचार करूनच ठरविलेल्या आहेत. 
या ऋतूत आहार जसा भरपूर घ्यावा तसेच तो शक्तीवर्धनासाठी कारणी लागावा म्हणून व्यायामही भरपूर करावा. जोर, बैठका, सूर्यनमस्कार, धावणे, उड्या मारणे, वजन उचलणे, पोटाचे व्यायाम असा सर्व प्रकारचा व्यायाम करावा. नंतर तिळतेलाने मसाज करून अभ्यंगस्नान करावे. 
थंडीपासून बचाव व्हावा म्हणून स्वेटर, मफलर, शाल, हातमोजे, पायमोजे, टोपी वापरावी. रात्री रग, ब्लॅंकेट, रजई, लोकरीच्या कपड्यांचा वापर करावा. दुचाकीवरून प्रवास करताना वारा लागू नये म्हणून मफलर, रूमाल गुंडाळावा. पायाला भेगा पडू नये म्हणून पायमोजे, बूट वापरावे. सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्यावे. दुपारी अजिबात झोपू नये, विशेषत: वृध्दांनी हे पाळावे. हात धुण्यासाठी, पिण्यासाठी कोमट पाणी वापरावे. 
हिवाळ्यात आपले शरीर निरोगी असते.  फारसे आजार होत नाहीत. तरीही वरील प्रमाणे आहारविहारांचे पालन केल्यास हा हिवाळा आपणास निश्चितच ऊबदार वाटेल . 

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड