बाभूळ


                 ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अशी म्हण प्रसिद्ध आहे. बोरी बाभळी ह्या रानोमाळ उगवणारया काटेरी वनस्पती आहेत. बाभळीचा पाला हा शेळ्या- मेंढ्यांचे आवडते खाद्य आहे. 
                बाभूळ ही तुरट रसाची आहे. कडू, तुरट रसाच्या द्रव्यांनी दात घासल्याने दातांचे आरोग्य चांगले रहाते. बाभळीच्या कोवळ्या काड्यांनी दात घासावेत. दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले रहाते. दातांच्या आणि हिरड्यांच्या विकारांवर बाभळीच्या काड्या, साल याच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. गुळण्या कराव्यात म्हणजे तोंडात काढा घेऊन फक्त खळखळ गुळण्या असे नव्हे तर, गुळण्या करण्यापूर्वी तो काढा तोंडात १० ते २० सेकंद धरून ठेवावा. त्यामुळे जास्त चांगला परिणाम मिळतो. तोंड येणे, तोंडात जखम, हिरड्यांचे, दातांचे विकार यावर खूप चांगला उपयोग होतो. 
                   डिंकाचे लाडू सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या लाडूंमध्ये जो डिंक वापरतात तो बाभळीचा डिंक असतो. तांबडा-पांढरा अशा रंगाचा तो डिंक असतो. हा मधुर रसाचा, थंड आहे. हा शक्तिवर्धक, विशेषतः शुक्राचे प्रमाण वाढविणारा आहे. शुक्रधातूचे प्रमाण कमी असणे, दौर्बल्य, स्पर्म काऊंट कमी असणे, शीघ्रपतन यावर डिकाचे लाडू गावठी तुपात वळून खावेत. त्यावर गायीचे दूध घ्यावे. अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात. लघवी कमी असणे यावरही डिंकाचा उपयोग होतो. बाळंतनंतर येणारा अशक्तपणा यावर डिंकाचे, मेथीचे लाडू द्यावेत. हे लाडू आपले खास वैशिष्ट्य आहे. 
                      अस्थी धातू जोडण्याचे कार्य बाभळीने होते. डिंक, साल यामध्ये हे गुण आहेत. बाभूळ रक्तस्तंभक आहे. रक्तस्राव, अग्नीचे व्रण यावर बाभळीच्या पाल्याचा उपयोग होतो. बाभूळ कफघ्न आहे. रानोमाळ उगविणारी बाभूळ अशी औषधी गुणयुक्त आहे. 

Comments

Unknown said…
बाभळीच्या शेंगा मधील बिया विषारी असतात का??

Popular posts from this blog

हळद

उपयुक्त वड