तुळस
मंडळी,
भारतीय संस्कृतीत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक हिंदुच्या दारापुढे तुळशीवृंदावन असतेच. भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशीला पूजनीय वनस्पतींमध्ये अग्रस्थान आहे. ही वनस्पती फक्त भारतीय उपखंडातच आढळते. सध्या मनपा निवडणुका जवळ आल्यामुळे गल्लोगल्लीच्या नेत्यांच्या पुढाकारामुळे तुळशीची लग्ने धूमधडाक्यात पार पडत आहेत. असो.
साध्या सर्दी खोकल्यापासून तर अनेक आजारांवर तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या एका एका गुणावर Ph.D. च्या डिग्र्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या आहेत.
तुळशीच्या प्रकारांपैकी पांढरी (राम) व काळी (कृष्ण) तुळस हे दोन मुख्य प्रकार. कृष्ण तुळस ही गुणांनी सर्वात श्रेष्ठ आहे.
तुळशीचा चहा दूध व चहा न टाकता घेतल्यास सर्दी, खोकला, ताप यावर उपयुक्त आहे. तुळशीचा काढा करून घेतल्यास तो वरील विकारांबरोबरच घसा दुखणे, अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे यावर उपयुक्त आहे. एक भाग तुळस म्हणजे पाने, सोळा भाग पाणी एकत्र करून एक अष्टमांश राहीपर्यंत आटवावे. नंतर गाळून तो काढा प्यावा. ही काढा करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.
दम्यावर तुळशीचा खूप उपयोग आहे. तुळशीचा रस काढून तो मधातून चाटविला असता दम कमी होतो. तुळशीचा रस हा इतर औषधे घेण्यासाठी अनुपान म्हणूनही घेतात.
विषमज्वरावर (ठराविक दिवसाने येणारा ताप) तुळशीचा खूप चांगला उपयोग होतो.
तुळस ही ऊष्ण आहे, तर तुळशीचे बी थंड आहे. तोंड आल्यास तुळशीच्या बीची खीर प्यावी. तुळशीचे बी लघवीचे प्रमाण वाढविते. लघवीला आग, जळजळ यावर बियांची खीर घ्यावी. शौचाला शेम-चिकट होणे यावर बियांची खीर घ्यावी.
शीतपितावर, त्वचेवर गांधी, खाज येणे यावर तुळशीच्या पानांचा रस तेथे लावावा. लहान मुलांच्या वांतीवर तुळशीच्या पानांचा रस मधातून चाटवावा.
तुळशीला मंजिरी आल्या की पानांचे गुणधर्म कमी होतात. अर्थात तरीही तुळशीचा वापर करावा. अशी ही तुळस बहुगुणी आहे.
Comments