तिळाचे महत्त्व

        साधारणपणे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यामध्ये शिशिर ऋतु येतो. या ऋतूत सृष्टीत सर्वत्र रूक्षता असते. झाडांची पाने गळतात, त्याला पानगळ म्हणतात. वातावरणात बोचरी थंडी, गारठा असतो. अशा काळात मकरसंक्रांत येते. भारतीय संस्कृतीत असलेल्या सर्व रुढी, परंपरा ह्या भारतीय हवामानाचा विचार करूनच तयार केलेल्या आहेत. म्हणूनच मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळगू  वाटण्याची प्रथा आहे. तीळगूळामध्ये तीळ आणि गूळ हे दोन प्रमुख घटक असतात.
       तिळाचे आयुर्वेदात फार महत्त्व वर्णन केलेले आहे. तिलोद्भवम तैलम ।  तिळापासून निघते ते तेल होय. म्हणूनच तेलाला ’तेल’ हे नाव प्राप्त झाले. तेलात तीळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. शिशिर ऋतूत शरीरातील स्नेह कमी झालेला असतो, रुक्षता वाढलेली असते. अशा वेळी तिळाचे नियमित सेवन करावे. तीळ हे मधुर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टीक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत.
      सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. हिवाळ्यात तिळतेलाने अंगाला अभ्यंग करावे. त्यामुळे त्वचा मऊ, कांतिमान होते. सांधेदुखी, अंगदुखी, स्नायुदुखी यावर तिळतेलाची मालिश करतात. हे तेल व्रणरोपक आहे. अस्थी धातूवृद्धीकर म्हणून, अस्थी भग्नावर याचा चांगला उपयोग होतो. कृश व्यक्तींना स्थूल करणारे आणि स्थूल व्यक्तींना कृश करणारे असे हे तिळाचे तेल आहे.   
     गुळ मधुर, उष्ण, पौष्टीक आहेत. तीळगूळ हा पदार्थ पौष्टीक, बलदायक, शरीरातील स्नेह वाढविणारा आहे. साखरेच्या हलव्यापेक्षा तिळगुळ हा पदार्थ आरोग्यदायक आहे.
    संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी पाण्यात तीळ घालून स्नान करतात. पाण्यात तेलाचा अंश उतरावा आणि त्वचा मऊ व्हावी हा त्यामागील उद्देश असतो. बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा त्या दिवशी बेत असतो.
    श्री गणेश जयंतीला सुद्धा तिळगुळापासून केलेल्या लाडूचा नैविद्य दाखवितात. या ना त्या कारणाने तिळगुळाचे सेवन व्हावे, अशी योजना असते. तिळगूळ वाटण्यामागे माणसाच्या मनातील स्नेह्भाव वाढावा, शत्रुत्व नाहीसे व्हावे असाही उद्देश असतो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा यातच तिळाचे महत्त्व लक्षात येते.

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड