धनुर्मास

      धनुर्मासालाच धुंधुरमास किंवा धन्धुर्मास असेही म्हणतात. हिवाळ्यामध्ये वातावरणातील शीतलतेमुळे देहोष्मा  शरीरांतर्गत जातो आणि त्यामुळे जाठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागते. अशा वेळी त्या जाठराग्नीला अनुरूप असा आहार घेतला नाही तर तो शरीरातील धातूंचे पचन करून दुर्बलता आणतो. त्यामुळे बल, पुष्टीदायक असा आहार घेणे आवश्यक आहे.  
       यासाठीच या काळात धनुर्मास पाळायची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची प्रथा आहे. त्यावेळी उठल्यानंतर आन्हिके उरकल्यावर नैविद्य दाखवून भरपेट भोजनच करावे अशी धनुर्मासाची प्रथा आहे. आहे की नाही खवैय्यान्साठी पर्वणी !
       भोजनासाठी पदार्थ तरी कोणते ? गरम  गरम  खिचडी, त्यावर तूप,  तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, त्यावर लोणी, भरीत, वांग्याची भाजी, कढी, चटणी. 
       काय मंडळी सुटले की नाही तोंडाला पाणी ?  
       अशा रीतीने जाठराग्नीचे शमन झाल्यावर मग पुढील दैनंदिन व्यवहाराला लागायचे, अशी प्रथा होती.
       अर्थात हा धनुर्मास फक्त हिवाळ्यात पाळायचा असतो. पंचांगातसुद्धा धनुर्मास सुरु कधी होतो आणि संपतो कधी हे दिलेले असते. सूर्याच्या धनुराशीतील वास्तव्याच्या महिन्याला धनुर्मास म्हणतात.

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड