आघाडा
श्रावण महिना सुरु झाला की आघाड्याच्या शोधात आपण बाहेर पडतो. श्रावणात विविध देव देवतांना बेल, आघाडा, दुर्वा वाहातात. इतर वेळी मात्र आपल्याला ह्या वनस्पतींची आठवण होत नाही. पावसाळ्यात आघाडा जागोजागी उगवतो. पांढरा आघाडा आणि तांबडा आघाडा असे आघाड्याचे मुख्य दोन प्रकार आहेत.
आघाड्यापासून क्षार तयार करतात. त्याला 'अपामार्ग क्षार' असे म्हणतात. याचा उपयोग मूतखड्यावर होतो. अपामार्ग क्षारापासून तेल तयार करतात. त्याचा उपयोग बहिरेपणा, ऐकू न येणे, कानात विविध आवाज येणे यावर होतो. अपामार्ग क्षार हा वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. कारण तो तीक्ष्ण आहे.
पूर्वी दात घासण्यासाठी आघाड्याच्या काडीचाही उपयोग करीत. त्वचारोगावर आघाड्याच्या काढ्याचा उपयोग करतात. खोकल्यावर याचे चूर्ण मधातून चाटवावे. आघाडा हा वामक आहे. याच्या सेवनाने उलट्या होऊ शकतात. म्हणून वैद्याच्या सल्ल्याने याचा वापर करावा.
पायात काटा विशेषत: बाभळीचा काटा मोडल्यास आघाड्याचा रस चोळून लावावा, काटा वर येतो.
Comments