केळी
जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीची झाडे बहुतकरून सगळीकडे होतात. काहींच्या मामांच्या मालकीच्या केळीच्या बागाही असतील. असो. केळ्यांचे वेफर्स हा लोकप्रिय पदार्थ आहे. कच्च्या केळ्यांची, केळफुलांची भाजी करतात. केळ्यांची कोशिम्बिरही करतात. काही केळीच्या प्रकारांमध्ये केळाच्या गाभ्यात बिया असतात. रानकेळीमधल्या बिया 'देवी' या विकारावर अतिशय उपयुक्त आहेत. केळापासून 'कदलीक्षार' तयार करतात. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. केळे हा गोड, थंड, कफवर्धक, बलवर्धक पदार्थ आहे. केळे पचायला जड आहे. खूप भूक लागली असताना नुसती केळी खाल्ली असता उत्साही, तरतरीत वाटते. रानकेळीचे बी पिसाळलेल्या कुत्र्याच्या विषावर उपयुक्त आहे, अशी वृद्ध वैद्य परंपरेत दिलेले आहे. खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे, यावर केळीचे सेवन करावे. मात्र दूध आणि केळी एकत्र करून खाऊ नये, ते विरुद्धान्न आहे. विरुद्धान्न सेवन केल्यामुळे अनेक विकार होतात. केळी किंवा कोणतेही फळ आणि दूध यांचे शिकरण करून खाऊ नये. केळीच्या पानावर भोजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्याने अन्नात केळीचे गुण उतरतात. शिवाय भांडी घासण्याचा त्रास तर वाचतोच आणि सुखाने भोजन करता येते. अम्लपित्त, अशक्तपणा यावर केळी खावी. केळी तहान भागविणारी आहेत. हे बाराही महिने मिळणारे स्वस्त आणि पौष्टिक फळ आहे. मात्र कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी केळी खाऊ नयेत. केळ्यांचे अजीर्ण झाल्यास वेलदोड्याची पूड खावी, म्हणजे पचन होते.
Comments