नैसर्गिक शीतपेयांचा आस्वाद घ्या !

    उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जशजशी वाढू लागते, तसतसे थंडपेयांच्या दुकानाकडे आपले पाय वळू लागतात. दूरदर्शनवरून होणारा जाहिरातींचा मारा आणि त्यांची चटकदार चव यामुळे कृत्रिम शीतपेयांची आर्डर आपोआप दिली जाते. पण प्रमाणाबाहेर स्ट्राँग पेय आणि साखर यामुळे कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने आरोग्य बिघडते. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपाची शीतपेये घेतल्यास ती पोषण करणारी, थंड, शरीराची ऊष्णता कमी करणारी असतात.
    पाणी-  पाणी ही सर्वोत्कृष्ट नैसर्गिक शीतपेय आहे. ते खरे जीवन आहे. आयुर्वेदात पाण्याचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म वर्णन केलेले आहेत. त्याविषयी नंतर कधी तरी. पाणी हे थंड आहे. फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातले गार केलेले पाणी चांगले. उन्हाळ्यात पाणी उकळून गार करून प्यावे. फील्टरचे पाणी जरी शुद्ध असले तरी पाणी उकळल्याने ते गुणांनी हलके होते. फ्रीजमधील थंड पाण्यामुळे भूक कमी होऊन पोटात जडपणा वाढतो, उलट माठाचे पाणी तुलनेने हलके असते. वाळा, चन्दन, मोगरा, गुलाब यासारख्या सुगंधीत द्रव्यांनी सुगंधीत करून प्यावे.
    शहाळ्याचे, नारळाचे पाणीही तहान भागविणारे, थंड, उत्साहवर्धक, मूत्रल आहे. ते मात्र आहे त्या स्वरूपातच प्यावे. ताजी नीरा हीसुद्धा थकवा घालविणारी, उत्साहवर्धक आहे.
फ्रूट ज्यूसेस-  वेगवेगळ्या प्रकारची फ्रूट ज्यूसेस बाजारात मिळतात. ही ज्यूसेस ताजी असतानाच घेणे चांगले. दूध आणि फळांचा रस एकत्र करून घेतले जाते. मात्र हे विरूद्धान्न असल्यामुळे घेऊ नये. नुसता फळांचा रस घेणे केव्हाही चांगले. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील द्रव घटक कमी होतात. अशावेळी द्रवपदार्थ, जलीय पदार्थ जास्त घ्यावेत. फळांचे रस पिताना त्यामध्ये बर्फ टाकून पिण्यापेक्षा भांड्याच्या आजूबाजूला बर्फ ठेवून थंड करून प्यावा. तसेच फ्रूट ज्यूसेस तयार करताना त्याची कृत्रिम चव वाढावी म्हणून त्यामध्ये काही अर्क टाकले जातात, ते उत्तम दर्जाचे असावेत. शक्यतो नैसर्गिक चवीची फ्रूट ज्यूसेस घेणे चांगले. फ्रूट ज्यूसमध्ये आईस्क्रीम टाकून घेऊ नये. उन्हाळ्यात भूक कमी झाल्यामुळे पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत. डाळींब, टरबूज, आंबा, अननस, चिकू, सिताफळ, संत्री, मोसंबी यासारख्या फळांचा ज्यूस घ्यावा.
ऊसाचा रस-   हे थंड, शक्तीवर्धक, उत्साह आणणारे, लघवीचे प्रमाण वाढविणारे, नैसर्गिक शीतपेय आहे. याबद्दल मी याआधीच ब्लॉगवर लिहिले आहे.
कैरीचे पन्हे-   कैरी उकडून किंवा किसून केलेले पन्हे हेही उत्तम पेय आहे. किंचित आंबट-गोड, खारट असे हे पेय जिभेची चव वाढविणारे, स्फूर्तीदायक आहे. मात्र ते खूप आंबट नसावे. तसेच ते ताजे घ्यावे.
सरबते-   बाजारात मिळणा-या आणि भरपूर साखर घालून कराव्या लागणाया सरबतापेक्षा नैसर्गिक सरबते केव्हाही चांगली. लिंबू सरबत, कोकमचे सरबत, संत्री, मोसंबी, डाळिंब, गुलाब यांचे सरबत नैसर्गिक स्वरूपात घ्यावे. सरबतात बर्फ न घालता फक्त थंड पाणी घालून घ्यावे.
ताक-   हेही सर्वोत्तम शीतपेय आहे. ताक नेहमी ताजे घ्यावे. तसेच खूप आंबट नसावे. दही घुसळून लोणी काढून टाकलेले ताक हे नियमित प्यावे. सर्वात कमी कॅलरी असणारे हे शीतपेय आहे. घट्ट दही, लस्सी जिच्यातून लोणी काढलेले नाही, असे घेऊ नये. ताकात थोडे सैंधव, साखर, जिरे घालून घ्यावे. शिळे ताक, आंबट ताक घेऊ नये. विविध फळांचे ज्यूसेस आणि लस्सी-आईस्क्रीम असे एकत्र करून घेऊ नये.
फ्रूट सॅलड-   फ्रूट सॅलड करताना फळे आणि दूध एकत्र करून घेतले जाते. शिकरण, फ्रूट सॅलड हे पदार्थ पचायला जड होतात. त्याऐवजी नुसता फळांचा गर एकत्र करून घेतला तर चालेल. फक्त ती फळे वेगवेगळ्या गुणधर्माची नसावीत.
    उन्हाळ्यात सातूचे पीठ दूधात कालवून घेणे हाही एक चांगला थंड पदार्थ आहे. गहू आणि डाळ्या किंवा सातू धान्याचे पीठ हे दूधात मिसळून साखर घालून घ्यावे. हे थंड, शक्तीवर्धक आहे.
    लाहीचे पीठ ताकात मिसळून त्यात मीठ, जिरे घालून घेतल्यासही चविष्ट लागते.
    कोकण भागात नाचणीचे आंबिल पिण्याचे प्रथा आहे. हेही थंड, हलके आहे.
    आयुर्वेदात ’खर्जूरादि मंथ’ सांगितलेला आहे. खजूर, मनुका, फालसा, आमसूल, डाळींब पाण्यात भिजवून कुस्करून ते गाळून तयार झालेले पेय प्यावे. ते थंड, तहान भागविणारे, तृप्तीदायक, जिभेला चव आणणारे आहे.
    म्हणजे बघा एवढी भरपूर प्रकारची, वेगवेगळ्या चवीची नैसर्गिक शीतपेये आपल्याला उपलब्ध असताना आपण उगाचच ’ये दिल मांगे मोअर’ म्हणत ’ठंडा मतलब’ च्या मागे धावत असतो आणि कृत्रिम शीतपेये पिऊन आजार वाढवित असतो.                 

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड