अभ्यंग स्नान - त्वचा सौन्दर्यासाठी

            आपल्या शरीरातील अवयवांचे त्वचा रक्षण करीत असते. त्वचा हे शरीराचे बाह्य आवरण आहे. तसेच शरीराचा मुख्य प्रदर्शनीय भाग आहे. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य निगा राखल्यास व्यक्तीमत्त्वाची उत्तम छाप पडते. त्वचेचे पुष्कळ विकार हे हृदयरोग, बेशुद्धी यासारखे गंभीर नसतात. त्यामुळे बऱ्याचदा त्वचा विकारांकडे दुर्लक्ष्य केले जाते. परंतु एकूणच आरोग्याच्या दृष्टीने त्वचाविकारांवर योग्य  उपचार घेणे, त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी  त्वचेचे रक्षण व्हावे, त्वचेचे निगा योग्य प्रकारे  राखली  जावी यासाठी आयुर्वेदात अभ्यंग स्नानाचे  महत्त्व सांगितलेले आहे.  
           हिवाळ्यात वातावरणातील रूक्षतेमुळे  त्वचा रूक्ष  व फुटीर होते. त्यामुळे ह्या ऋतूत त्वचा विकार होण्याचा जास्त संभव असतो. त्याचप्रमाणे पूर्वीपासून असणारे, सुप्तावस्थेत असणारे त्वचाविकार बळावण्याचा संभव हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान, पथ्यापथ्य पाळणे, आयुर्वेदिक औषधे घेणे  यासारख्या उपायांनी त्वचेची काळजी  घेणे हितावह ठरते. आपण फक्त दिवाळी सारख्या मंगल प्रसंगीच अभ्यंग स्नान करीत  असतो. परंतु केवळ दिवाळीतच नाही तर हिवाळ्यात आणि इतरही ऋतूत रोजच अभ्यंग करावे असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. भारतीय संस्कृतीत स्नानाचे महत्व वर्णन केलेले आहे. कार्तिक स्नान, माघ स्नान असे पंचांगात वर्णन आढळते. कार्तिक महिन्यात, माघ महिन्यात भल्या पहाटे उठून केलेल स्नान म्हणजेच कार्तिक स्नान, माघ स्नान. त्यानंतर भगवन्ताची आराधना, काकडारती करतात. धार्मिक कारणाने  का होईना प्रत्येकाने पहाटे उठून अभ्यंग स्नान करावे हा त्यामागे उद्देश आहे. 

           पहाटे उठून केलेल्या स्नानाचे महत्त्व जास्त आहे. नियमित पहाटे उठून अभ्यंग करायला सांगितले आहे.  अभ्यंग करणे सुगंधी औषधी तेल हलक्या हाताने शरीराला लावणे. सर्वांनी घरच्या घरी रोज अभ्यंग करण्याचे अनेक फायदे आहेत. अभ्यंगामुळे वार्धक्य लांबते , तारूण्य टिकते, त्वचेच्या सूरकुत्या कमी होतात. Anti- Aging परिणाम मिळतात. श्रम केल्यामुळे थकवा आला असेल तर तो कमी होतो. वाढलेल्या वात दोषाचे शमन होते. रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपल्याला श्रम होतात. तो थकवा कमी होण्यासाठी अभ्यन्ग करावे. नियमीत अभ्यंग केल्याने दृष्टी सुधारते, शरीर पुष्ट होते, झोप चांगली लागते, आयुष्य  वाढते , त्वचा सुकुमार, मऊ  होते., शरीराचे स्नायू पिळदार  होतात. त्याही पुढे जाऊन 
शिर:  श्रवण पादेषु तं विशेषेण शिलायेत   असे म्ह्टले आहे.
            डोके, कान, पाय, या ठिकाणी विशेष करून रोज अभ्यंग करावे. केसांच्या वा चेहरयाच्या आरोग्यासाठी केस डोके, चेहरा यांना नियमित अभ्यंग करावे. पायांच्या आरोग्यासाठी पायांनाही अभ्यंग करावे. 

          वमन, विरेचन इ. पन्चकर्म झालेल्या व्यक्ती, अजीर्ण झालेल्या व्यक्ती, कफ दोषाचे  विकार झालेले यांना अभ्यंग करू नये. 
          अभ्यंगासाठी विविध औषधानी  सिद्ध केलेली तेले वापरली जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळी तेले वापरतात. वात प्रकृतीची  त्वचा रूक्ष, फुटीर असते. पित्त प्रकृतीची  पिन्गट, सुकुमार असते. कफ प्रकृतीची त्वचा पांडुरकी, स्नेहयुक्त असते. अशा वेगवेगळ्या त्वचेच्या आरोग्यासाठी वेगवेगळी तेले वापरली जातात. कफ प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा तेलकट असते. त्यांनी अभ्यंगानन्तर स्नानाच्या वेळी उद्वर्तन म्हणजे उटणे लावावे. त्यामुळे त्वचेवरील जास्तीचे तेल निघून जाण्यास मदत होते. त्वचेखालील चरबी  कमी  होण्यास मदत होते. पित्तप्रकृतीच्या  व्यक्तींना दुर्गन्धीयुक्त घाम येतो. त्यांनी स्नानाच्या वेळी घाम कमी करणार्‍या वनस्पतींपासून केलेले उटणे लावावे. 
          स्नान करताना डोक्यावरून करावे. असे असले तरी काही व्याधीत चेहर्यापासून खाली स्नान करावे. डोक्यावरून कोमट पाणी घ्यावे. गरम पाणी घेऊ नये. कारण डोळ्यांना त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात सुखोष्ण पाण्याने स्नान करावे. उन्हाळ्यात कोमट किंवा गार पाण्याने स्नान करावे. स्नानानन्तर सर्व अंग, केस कोरडे करावेत. 
         अशा प्रकारे अभ्यंगयुक्त स्नान केल्यास आपल्या त्वचेच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल. 

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड