आले- सुंठ
आल्यापासूनच सुंठ तयार करतात. दिसायला हे अतिशय किरकोळ औषध
वाटत असले तरी त्याच्या अंगी गुणधर्म खूप आहेत. आले पाकात टाकून त्याच्या वड्या
करतात. ह्या आलेपाकाच्या वड्या सेवन केल्या असता उत्तम भूक लागते. अपचन, करपट
ढेकर, जिभेला चव नसणे यावर आलेपाकाच्या वड्या सेवन कराव्यात. नुसत्या सुंठेनेही
खूप छान भूक लागते, जिभेला चव येते. पोटात वाट साठून पोट दुखत असल्यास सुंठ कोमट
पाण्यातून घ्यावी. दमा, सर्दी, खोकला यावर सुंठ मधाबरोबर चाटवावी. ‘सुंठेवाचून
खोकला गेला’ अशी म्हण म्हणूनच प्रचारात आहे. सुंठ हे ७२ रोगांवरचे औषध आहे असे
म्हणतात ते खरेच आहे. आयुर्वेदातले कफदोषावरील हे अतिशय महत्त्वाचे औषध आहे.
डोके दुखत असल्यास कपाळाला सुंठेचा लेप लावावा. सर्वसाधारण
तापाच्या सुरुवातीला अंग कसकस करीत असल्यास सुंठ घ्यावी. सांधेदुखी, सांधे सुजणे,
यावर सुंठ व गूळ एकत्र करून खावा. त्याला गुड सुंठी योग म्हणतात. अजीर्ण होऊन जुलाब
होत असल्यास सुंठ घ्यावी. अम्लपित्तावर सुंठ व साखर एकत्र करून खावी. सर्दी विशेषतः
पावसाळ्यात खूप झाली असल्यास सुंठेचा काढा घ्यावा किंवा चूर्ण मधातून घ्यावे. लहान
मुलांच्या सर्दी-खोकल्यावर सुंठ चूर्ण मधातून चाटवावे. सर्दीमुळे डोके दुखणे,
सर्दी मोकळी न होणे, यावर सुंठ चूर्ण नाकाने हुंगावे. १ वर्षापुढील लहान मुले नीट
जेवत नाहीत, भूक लागत नाही, त्यामुळे त्यांची वाढ नीट होत नाही, यावर चिमूटभर सुंठ
मधातून नियमित चाटवावी. सुंठेमुळे मुलांची जंताची सवय जाते. उलट्या होत असल्यास
आल्याचा रस खडीसाखरेतून किंवा मधातून चाटवावा.
नुकतीच प्रसुती झालेल्या स्त्रियांमध्ये इतर व्याधी होऊ
नयेत म्हणून ‘सौभाग्यशुन्ठी पाक’ हे औषध वापरतात. लठ्ठपणावर सुंठ कोमट पाण्यातून
घेतल्यास वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
सुंठ ऊष्ण आहे म्हणून पित्तप्रकृतीत, उन्हाळ्यात, शरद ऋतूत
जपून वापर करावा.
Comments