धनुर्मास

 

धनुर्मास

© लेखक- डॉ. गोपाल मेघश्याम सावकार,

चेतनानगर, इंदिरानगर Annex, नाशिक

फोन नं.- 8149988904,

इमेल- gsawkar@gmail.com 

उत्तरायणातील शिशिर ऋतूत धनुर्मास येतो. सूर्याच्या धनुराशीतील वास्तव्याच्या महिन्याला धनुर्मास म्हणतात. धनुर्मासालाच धुंधुरमास, झुंझुरमास अथवा शून्यमास किंवा धन्धुर्मास असेही म्हणतात. हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्म मुहूर्त म्हणजेच देवतांची पहाट असते, असे म्हटले जाते. पंचांगातसुद्धा धनुर्मास सुरु कधी होतो आणि संपतो कधी हे दिलेले असते. त्या काळात पहाटेच्या वेळी नैविद्य दाखवून पहाटे किंवा सकाळी लवकर जेवण घेण्याची प्रथा आहे. मुगाची खिचडी, कढी, बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत, तूप असा चविष्ट बेत या दिवसात करतात. सकाळी सकाळी भरपेट जेवण व्हावे असा हेतू त्यामागे आहे.  दक्षिण भारतात धनुर्मासाचे खूप महत्त्व आहे. त्या काळात विष्णूची पूजा केली जाते.

मकरसंक्रांतीच्या आधी भोगी येते. त्यादिवशीही असाच बेत करतात. भोगीची भाजीही प्रसिद्ध आहे. हरबरा, वांगे, कांदे, वाल, मेथी, वाटाणे, गाजर, खोबरे, तीळ अशी मिक्स व्हेज टाईप भाजी असते. पोपटी किंवा उंधियो याच प्रकारात मोडणारे. पोटात भरपूर भाज्या जाव्यात यासाठीच ही संकल्पना. शिशिर ऋतूत मकरसंक्रांत येते. तीळ, गूळ, गुळाची पोळी असे पौष्टीक, ऊष्ण, स्निग्ध पदार्थ मकरसंक्रांत, गणेश जयंती या निमित्ताने आहारात यावेत असा आयुर्वेदाचा शास्त्रीय दृष्टीकोन आहे. एकूणच भारतीय संस्कृतीत सण, रूढी ह्या हवामानाचा आणि ऋतूंचा विचार करूनच ठरविलेल्या आहेत. 

हिवाळ्यामध्ये वातावरणातील शीतलतेमुळे देहोष्मा  शरीरांतर्गत जातो आणि त्यामुळे जाठराग्नी प्रदीप्त होतो. त्यामुळे भूक जास्त लागते. अशा वेळी त्या जाठराग्नीला अनुरूप असा आहार घेतला नाही तर तो शरीरातील धातूंचे पचन करून दुर्बलता आणतो. त्यामुळे बल, पुष्टीदायक, स्नेह्युक्त असा आहार घेणे आवश्यक आहे.  वातदोषाच्या दुष्टीवर तिळाचे तेल हे उत्तम औषध सांगितलेले आहे. त्यामुळे पोटात तिळाचे तेल जाणे आणि त्याचबरोबर शरीराला अभ्यंगासाठीही बाहेरून तिळाचे तेल लावणे आवश्यक आहे. धनुर्मासाच्या उत्तरार्धात वातावरणातील रुक्षता अत्यंत वाढते. त्यामुळे शरीरही रुक्ष होते. त्यासाठी तिळाचा व तेलाचा वापर करावा.

यासाठीच या काळात धनुर्मास पाळायची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची प्रथा आहे. त्यावेळी उठल्यानंतर आन्हिके उरकल्यावर नैविद्य दाखवून भरपेट भोजनच करावे अशी धनुर्मासाची प्रथा आहे. आहे की नाही खवैय्यान्साठी पर्वणी !

भोजनासाठी पदार्थ तरी कोणते गरम  गरम  खिचडी, त्यावर तूपतीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, त्यावर लोणीभरीतवांग्याची भाजी, भोगीची भाजी, कढी, तिळाची चटणी. 
       काय मंडळी सुटले की नाही तोंडाला पाणी ?  
       अशा रीतीने जाठराग्नीचे शमन झाल्यावर मग पुढील दैनंदिन व्यवहाराला लागायचे, अशी प्रथा होती. अर्थात हा धनुर्मास फक्त हिवाळ्यात आपापल्या जाठराग्नीचा विचार करूनच पाळायचा असतो.

© लेखक- डॉ. गोपाल मेघश्याम सावकार,

चेतनानगर, इंदिरानगर Annex, नाशिक

फोन नं.- 8149988904,

इमेल- gsawkar@gmail.com

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड