Hand Foot Mouth आजार अर्थात टोमॅटो फ्ल्यु
मंडळी,
सध्या लहान मुलांमध्ये अंगावर विशेषतः हात आणि पाय यावर लाल पुळ्या येणे, त्यातून पाणी येणे, खाज येणे अशी लक्षणे असलेला आजार साथीच्या स्वरूपात पसरलेला आढळतो आहे. सध्या 'मंकी पॉक्स' या आजाराचा बोलबाला असल्याने अनेक पालक घाबरून जाताहेत. पण पालकांनो, काळजी करू नका. या आजाराचा आणि मंकी पॉक्स या आजाराचा सबंध नाही. मंकी पॉक्स हा आजार भारतात पसरलेला नाही. सध्या लहान मुलांमध्ये दिसणारा हा आजार 'HAND, FOOT, MOUTH (HFMD)' या आजाराशी साधर्म्य दाखविणारा आजार आहे. खूप पाउस, कोंदट वातावरण, त्यानंतर लगेच कडक उन यामुळे असे आजार पसरतात. आयुर्वेदात वर्णन केलेले शीतला, रोमान्तिका आजारांच्या जातकुळीतील हाही आजार आहे. हा लहान मुलांमध्ये संपर्काने पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. यामुळे अंगावर लाल पुळ्या, त्यातून पाणी येणे, खाज येणे, अंग दुखणे, ताप येणे, काहींमध्ये भूक कमी होणे, घसा दुखणे, सर्दी, डोळे लाल होणे अशीही लक्षणे आढळतात. हा SELF LIMITING आजार आहे. हा १० ते १२ दिवसात बरा होतो. त्यामुळे घाबरू नका.
सर्वप्रथम प्रतिबंधात्मक उपचार करावेत. आजार झालेल्या मुलांना ८ दिवस इतर मुलांच्या संपर्कात पाठवू नये. रोज आंघोळीच्या वेळी शरीराची स्वच्छता करावी. हाता पायाची स्वच्छता ठेवावी. नखे कापावीत. पुळ्या खाजवू नयेत. खाज येऊ नये म्हणून कडूनिंब तेलासारखी औषधे वैद्याच्या सल्ल्य्याने लावावीत. ताप असेल तर तापावरील औषधे वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत. महासुदर्शन, परिपाठादि, गुळवेल यासारखी औषधे शरीराची उष्णता कमी करण्यासाठी वैद्याच्या सल्ल्य्याने घ्यावीत. कोमट पाणी प्यावे, ताजे, हलके अन्न घ्यावे. आंबवलेले, शिळे, तिखट, तळलेले पदार्थ टाळावेत. मात्र त्रास जास्त वाढल्यास वैद्यांचा सल्ला लगेच घ्यावा.
डॉ. गोपाल मेघश्याम सावकार,
आयुर्वेद तज्ञ, चेतनानगर,
इंदिरानगर,
नाशिक , मोबाईल- 8149988904
gsawkar@gmail.com
Comments