पावसाळा, तब्येत सांभाळा !!
वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. तृषार्त धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही.
असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे.
आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रकोपावर ’बस्ती’ हा पंचकर्मांपैकी एक महत्वाचा उपक्रम आयुर्वेदात सांगितलेला आहे. विविध औषधांनी युक्त काढ्यांचा किंवा तेलाचा एनिमा विधिपूर्वक घेणे असे सोप्या भाषेत सांगता येईल. या बस्तीने अनेक संभाव्य रोगांचा प्रतिबंध होतो. तसेच वाताचे विकारही बरे होतात.
पावसाळ्यात भूक कमीच लागते. म्हणून भोजनासाठी अगदी हलका आहार घ्यावा. नविन धान्य वापरु नये. एक वर्ष जुने झालेले धान्य वापरावे. नविन धान्य वापरायचेच असेल तर ते भाजून घेऊन नंतर वापरात आणावे. आहारसुद्धा अगदी मोजकाच घ्यावा. जेवणही ठरलेल्या वेळीच घ्यावे. गोड पदार्थ, विविध पक्वान्ने, उडीदासारखे जड पदार्थ, तळलेले, आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत. कांदा खाऊ नये. सुंठ, हिंग, जिरे, मिरे, आले, लसूण, पुदिना, लिंबू ह्यांचा आहारात भरपूर वापर करावा. त्यामुळे भूक चांगली लागून अन्नपचनही चांगले होते. लसूण हा पावसाळ्यात उत्तम औषधी आहे. तो वातनाशक, भूक वाढविणारा आहे. म्हणून कच्चा लसूण, लसणाची चटणी, फोडणी अशा विविध प्रकारे लसूण वापरावा.
या ऋतूत पालेभाज्या जास्त वापरू नयेत. पालेभाज्या सारक असतात. तसेच त्या नीट धुतल्या गेल्या नाहीत तर पानांना माती, घाण तशीच रहाते व ती जेवणावाटे पोटात जाते. म्हणून पालेभाज्यांचा वापर शक्यतो कमीच करावा. गायीचे तूप भरपूर घ्यावे. गायीचे तूप स्निग्ध, भूक वाढविणारे, शक्तिवर्धक असते. म्हणून ते जेवणात नियमित घ्यावे. इडली, वडा, उत्तप्पा, डोसा, शेव, भजी, कचोरी, भेळ, पाणीपुरी, पाव, ब्रेड, दही, आंबट, तिखट, तळलेले पदार्थ, ह्यांचा अजिबात वापर करु नये. तसेच उघड्यावरचे, हातगाडीवरचे पदार्थ खाऊ नयेत. या पदार्थांनी रोगराई पसरण्याची शक्यता असते. तोंडाला चव यावी म्हणून कैरी, लिंबू, आले यापासून केलेल्या लोणच्यांचा अगदी थोडा वापर करावा. ह्या ऋतूत मांसाहार करू नये. मांसाहाराचे पदार्थ पचायला जड, तेल, तिखट भरपूर असलेले असतात .
खरे तर ह्या ऋतूत भूक कमी लागते, अग्नी मंद असतो म्हणून भारतीय संस्कृतीत ह्या ऋतूत उपवास जास्त सांगितलेले आहेत. पण आपले उपवासाचे पदार्थ भगर, साबुदाणा, शेंगदाणे, रताळी, शिंगाडे हे पदार्थ इतके जड असतात की असे उपवास करावेत की नाहीत यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आपल्या परंपरेमध्ये सांगितलेला उपवासामागील मूळ हेतूच नष्ट झालेला आहे. असो.
ह्या ऋतूत पाणी अतिशय गढूळ असते. पाण्यामुळे विविध रोग पसरण्याची शक्यता असते. म्हणून पाणी निर्जंतुक, फिल्टर करून किंवा गाळून, उकळून वापरावे. पहिला पाऊस पडून गेल्यावर नंतर एका भांड्यात वर फडके लावून त्यामध्ये पावसाचे पाणी साठवावे. याला आयुर्वेदात ’दिव्य जल’ असे म्हटले आहे. त्या पाण्याचा जमिनीशी कोणताही संपर्क आलेला नसतो. त्यामुळे त्यात कोणताही दोष येत नाही. हे शुद्ध पाणी वापरण्यास हरकत नाही. माठातले किंवा फ्रीजमधले पाणी वापरू नये. पाणी थोडे कोमटच प्यावे. कोमट पाणी पचायला हलके असते.
या ऋतूत घरात धूपन करावे. ऊद, गुग्गुळ, निंबाची पाने जाळल्यामुळे आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते.
अशाप्रकारे पथ्यकर आहार विहाराचे पालन केल्यास पावसाळा सृष्टीप्रमाणेच आपणासही उत्साहित करणारा, टवटवी आणणारा ठरेल .
Comments