शिशिर ॠतूतील काळजी

 

महाराष्ट्रात सध्या शहरांचा विकास सध्या जोरात सुरु आहे. उंच इमारतिंबरोबरच रस्ते, उड्डाणपूल, यांची कामे जोरात सुरु आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे, वेगवेगळ्या कारणांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. वातावरणात उडणारी धूळ, थंडी, धुक्यामुळे धूलीकण जमिनीलगतच्या वातावरणात जास्त वेळ राहतात. तसेच सध्या शिशिर ऋतू सुरु असल्याने वृक्षांची पानगळ सुरु आहे. ही गळालेली पाने, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जाळला जातो. त्याचाही धूर वातावरणात मिसळतो. हे धुलीकण, धूळ, धूर श्वासोच्छ्वासावाटे फुफ्फुसात, नाकात, जाऊन त्यामुळे विविध आजार होऊ शकतात.
रस्त्यावरील खड्डे, खाचखळगे यामुळे मानदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार होऊ शकतात. असलेले आजार वाढतात.
धूळ, धूर यामुळे असात्म्यताजन्य विकार बळावतात. सर्दी, शिंका, घसा दुखणे हे आजार होतात. दमा असल्यास दम्याचा वेग तीव्र होतो. लहान मुलांनाही याचा त्रास होतो. डोळ्यात कचरे जाणे, धूळ जाणे, डोळे लाल होणे, पाणी येणे असे डोळ्यांचेही आजार होतात.
यावर पुढील काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतील.
सर्दी, शिंका, खोकला- 
धूर, धुळीमुळे पुष्कळांना याचा त्रास होतो. किरकोळ वाटत असला तरी जुना झाल्यावर त्रासदायक ठरतो. यावर उपाय म्हणून बाहेर पडताना दोन्ही नाकपुड्यांना आतून तिळाच्या तेलाचे बोट लावावे. तसेच नाकाला, तोंडाला रुमाल बांधावा. वातावरण थंड असताना कोमट पाणी प्यावे. जेवतानाही कोमटच पाणी प्यावे. बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने हात, पाय, चेहरा धुवावा .नाक तोंड धुवून गुळण्या करून घसा साफ करावा. गळ्यापासून वर चेहऱ्याला तेल लावून वाफ घ्यावी. ‘नस्य’ हा पंचकर्मातील उपचार घ्यावा. 
     घसा दुखणे- 
      वरीलप्रमाणेच उपाय करावेत. तसेच त्रिफळा काढा, हळदीचा काढा याने दिवसातून ३ वेळा गुळण्या कराव्यात. १-१ चमचा मध ३-४ वेळा चाटावा.
     दमा- 
      दमा हा स्वतंत्र विषय आहे. या रुग्णांनी धूर, धूळ असणारे रस्ते टाळावेत. बाहेर जाण्याआधी दोन्ही नाकपुड्यांना आतून तीळतेल लावावे. चेहऱ्याला रुमाल बांधावा. नियमित नस्य करावे. अंघोळीच्या आधी छातीला तिळतेलाने मालीश करावे. योग्य काळी ‘वमन’ करावे.    
     डोळ्यांचे विकार- 
      दुचाकीवरून जाताना गॉगल वापरावा. डोळ्यात कचरा गेल्यास थंड पाण्याने डोळे धुवावेत. कापसाने स्वच्छ करावेत. तरीही कचरा न निघाल्यास वैद्यांकडे जावे. डोळे चोळू नयेत. डोळे लाल झाल्यास, जास्त पाणी येत असल्यास गुलाबपाण्याने डोळे धुवावेत. गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात. ‘नेत्रतर्पण’ केल्यास डोळ्यांचे विकार बरे होऊन डोळ्यांचे आरोग्य सुधारेल.
मान, पाठ, कंबरदुखी- 
खड्डे, खाच खळगे यातून चालणे, वाहन चालविणे यामुळेही हा त्रास होतो. यामध्ये स्नायू दुखावल्यामुळे त्रास आहे की मणक्याच्या विकारामुळे त्रास आहे हे मूळ कारण जाणून घ्या.  
स्नायू दुखावल्यामुळे त्रास असेल तर वैद्याच्या सल्ल्याने त्या जागेवर स्थानिक स्नेहन, स्वेदन म्हणजे औषधी तेलाने मसाज करून औषधी काढ्याने शेकावे. कटीबस्ती, मन्याबस्ती हे उपचार करावेत. पोटातूनही औषधे घ्यावी लागतात.
मणक्याच्या विकारांमुळे मान, कंबरदुखी असल्यास मानेचे, कंबरेचे काही व्यायाम, योगासने, औषधी तेलाचा मसाज, काढ्याचे शेक घ्यावेत. कटीबस्ती, मन्याबस्ती हे घ्यावेत, औषधी तेल, काढा यांचा बस्ती (एनिमा) घ्यावा. पोटातूनही गुग्गुळकल्पांसारखी औषधे घ्यावी लागतात.
आपले वाहन सुस्थितीत ठेऊन त्याचे शॉक अब्सोर्बर्स नीट ठेवावेत म्हणजे आपल्या मणक्याचे शॉक अब्सोर्बर्स नीट राहतील.
अशा प्रकारे आपण काळजी घेतल्यास व वैद्यांचा सल्ला घेतल्यास हे आजार टाळता येतील.
 
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9268384249421113"
     crossorigin="anonymous"></script>

Comments

Thanks for providing a valuable information to all of us!!
Sri Veda Sushruta Ayurveda Hospital is one of the leading and best Ayurvedic Hospitals in Hyderabad, offering completely natural solutions to a range of problems and disorders. Our team specialise in understanding the imbalance of the doshas that lead to problems you face.

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड