हिरडा



          हिरडा म्हणजे हरीतकी ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. सुरवारी हिरडा, बाळ हिरडा, रंगारी हिरडा असे याचे मुख्य प्रकार आहेत. नास्ती यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी म्हणजे ज्याच्या घरी आई नाही त्याची काळजी हिरडा घेतो. इतके हिरड्याचे महत्त्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे.

          भूक न लागणे, अन्न न पचणे, यावर बाळहिरडे खावेत. मलावष्टम्भावर हिरड्याचे चूर्ण रोज रात्री कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मूळव्याधीच्या आजारात संडासाला खडा होणे, कुंथावे लागणे, यावर हिरडा घ्यावे. अम्लपित्तावर हिरडा चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. खोकला, दमा, कफ, यावर हिरडा चूर्ण आणि पिंपळी चूर्ण मधातून चाटून खावे.

          हिरडा हा डोळ्यांना फार उपयुक्त आहे. डोळे येणे, डोळ्यांना लाली, सूज, डोळ्यांना आग, डोळ्यांना पाणी येणे, या डोळ्यांच्या विविध विकारांवर सुरवारी हिरड्याच्या क्वाथाने डोळे धुवावेत. हिरडा, बेहेडा, आवळा, यापासून त्रिफळा चूर्ण तयार करतात. रोज रात्री १ चमचा त्रिफळा, १ चमचा मध, २ चमचे तूप असे सेवन केल्यास डोळ्यांचे तेज वाढते. चष्म्याचा नंबर कमी होतो. मध आणि तूप मात्र सम प्रमाणात असू नये. हरीतकी हे रसायन आहे. रोज हिरडा चूर्ण सेवन केल्याने शरीर निरोगी रहाते. बुद्धी तरतरीत रहाते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. घाम जास्त येत असल्यास आंघोळीच्या वेळी अंगाला हिरडा चूर्ण लावावे. लहान मुलांना काही वेळा संडासाला होत नाही, कुंथावे लागते. अशा वेळी हिरडा पाण्यात उगाळून चाटवावा. दमा, उचकी लागणे यावर हिरडा, सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. अजीर्ण, भूक न लागणे यावर सुरवारी हिरडा आणि सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. काविळीवर हिरड्याचा चांगला उपयोग होतो. 
          असा हा हिरडा अनेक व्याधींवर गुणकारी आहे.

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड