जांभूळ
Black Berry या इंग्रजी नावाने प्रसिद्ध असलेले जांभूळ हे हंगामी फळ आहे. जांभळे, करवंदे ही फळे अस्सल ग्रामीण मेवा आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभळे पिकतात. हल्ली शहरीकरणामुळे जांभळाची झाडे दुर्मिळ झाली आहेत. जंगलात, शेतात बांधाबांधाने पिकणारी जांभळे शहरात हल्ली १०० ते १५० रु. किलो किंवा जास्तच भावाने मिळतात. जांभळाचा मोठा वृक्ष होत असल्याने शेतात व्यापारी तत्त्वावर लागवड करणे अवघड आहे. जांभळाची पाने, फळे, बी, झाडाची साल हे औषधी गुणयुक्त आहे. पाने ही पंचपल्लव या गटात मोडतात. जांभळामुळे शरीरात वातदोष वाढतो.
जांभळापासून घरी जांभूळपाक तयार करतात. अम्लपित्त, कफ, खोकला यावर जांभूळपाक उपयुक्त आहे. तोंड येणे, जिभेला फोड येणे, तोंडात जखमा, चट्टे येणे यावर भरपूर जांभळे खावीत किंवा जांभळाचा रस लावावा. कडुनिंबाप्रमाणेच जांभळाच्या काड्यांनी दात घासावेत. काड्यांचा काढा करून गुळण्या केल्यास मुखरोगांवर उपयोग होतो. मुखाची दुर्गंधी जाते, दात बळकट होतात. घामोळ्यांवर जांभळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात कालवून अंगाला लावावे.
अतिसार, जुलाब यावर जांभळाच्या सालीचे चूर्ण किंवा रस घ्यावा. उलट्या, मळमळ यावरही सालीचे चूर्ण द्यावे.
रक्तप्रदर, पाळीत अंगावरून जास्त जाणे यावर जांभळाच्या बी चे किंवा सालीच्या चूर्णाचा खूप चांगला उपयोग होतो. मुरुमे, तारुण्यपिटीका, चेह-यावरील डाग यावर जांभळाची बी दुधात उगाळून लावावी.
जांभळाचा सर्वात लोकप्रिय उपयोग म्हणजे मधुमेहावर होय. याचे पेटंट जाताजाता वाचले. मधुमेही व्यक्तींनी जांभळे भरपूर खावीत. जांभळाच्या बियांचे चूर्ण नियमित घेतल्यास साखर नियंत्रणात रहाते. अर्थात जोडीला व्यायाम हवाच. जांभळापासून केलेल्या जंब्वासवाचा मधुमेहात उपयोग होतो.
Comments