Posts

Showing posts from 2012

सीताफळ

                 सीताफळ हे अतिशय थंड आहे. म्हणूनच शीतफळ-शीताफळ-सीताफळ असे याला म्हणतात. सीताफळे साधारणपणे शरद ऋतूच्या शेवटी येतात. मात्र हे फळ थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा. ही फळे गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत.                    सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुलाम्नां लावाव्या. नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.                     लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न...
ब्लॉगवरील सर्व अनुयायी, वाचक, चाहते यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! ही दिपावली आपणा सर्वांना सुख, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना !

शरदाचे चांदणे २

मंडळी,            शरद ऋतूत विरेचन व रक्तमोक्षण या कर्मांबरोबरच आहारविहाराची पथ्येही पाळावी लागतात. रात्री विशेषतः जडान्न खाऊ नये. दही, क्षारयुक्त पदार्थ, बर्फ, थंड पदार्थ, जास्त खारट, आंबट, तिखट, मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत. भेळ, मिसळ, शेव, चिवडा, वडे, भजे, इडली, डोसा, पाणीपुरी आदि पित्तकारक पदार्थ खाऊ नयेत. जास्त चहा पिऊ नये. भात, ज्वारी, गहू, डाळी, द्विदल धान्ये वापरावीत.           पुरणपोळी गायीचे तूप टाकून खावी. लसूण, लोणचे पूर्णपणे बंद करावे. विविध फळे, मोरावळा, चांगले तूप खाण्यात असावे. आहार मोजकाच घ्यावा. पोटाला तडस लागेल इतके जेऊ नये.           शरद ऋतूत 'अगस्ती' ता-याचा उदय दक्षिणेला होतो. याचे माहिती आपण घेतली आहेच. अगस्ती ता-यामुळे शुद्ध झालेले पाणी या ऋतूत प्यावे. दिवसा ऊन जास्त असल्याने उन्हापासून बचाव करावा. टोपी, छत्री, गॉगल यांचा वापर करावा. अशा प्रकारे आपण आहार विहार ठेवल्यास हे शरदाचे चांदणे आपणाला निश्चितच सुखकर व आल्हाददायक वा...

शरदाचे चांदणे १

          शरदाच्या चांदण्याविषयी साहित्यामध्ये विपुल माहिती आढळते. शरद ऋतूमध्ये निसर्ग मोठा सुंदर भासतो. नुकताच पावसाळा संपल्यामुळे सर्वत्र हिरवळ, फुललेली रंगीबेरंगी फुले, यामुळे सृष्टी नवचैतन्याने नटलेली असते. दिवसा आकाशामध्ये शुभ्र ढग विहार करीत असतात, तर रात्री आकाश स्वच्छ, निरभ्र असते. असे निरभ्र आकाश, चमचमत्या चांदण्या, चंद्र यामुळे पडलेले चांदणे मोठे मनोहर भासते.            या सुरुवातीच्या काळात थोडा पाऊस असतो.  परंतु जसेजसे दिवस जाऊ लागतात, तसतसा पाऊस कमी होतो. शरद ऋतूच्या उत्तरार्धात पाऊस जवळजवळ नसतोच. दिवसा हवेतील ऊष्मा वाढू लागतो. त्यामुळे उकाडा असह्य होतो. 'ऑक्टोबर हीट' म्हणतात ती हीच. रात्री मात्र टिपूर चांदणे पडते. रात्री हवाही थंड, आल्हाददायक असते. म्हणून अशा वेळी रात्री उशिरापर्यंत चांदण्यात शिळोप्याच्या गप्पा रंगायच्या. रात्री चांदण्यात गच्चीवर थंड, आल्हाददायक हवेत शांत झोप लागते. पहाटे मात्र थंडी, दव पडते. दिवसा उकाडा वाढल्याने पावसाळ्यात संचित झालेल्या पित्तदोषाचा प...

माका

Image
                   शरद ऋतूत नदी, ओढ्याच्या काठी, पाणथळ जागी भरपूर माका उगवलेला दिसतो. पितृपक्षात श्राद्धाच्या पिंडांना वाहण्यासाठी माका वापरतात, एव्हढाच काय तो आपला आणि माक्याचा संबंध.  माक्यालाच भृंगराज असे संस्कृत नाव आहे. माका हा रसायन आणि बुद्धिवर्धक आहे. केसांच्या आजारांवर, वाढीवर अत्यंत उपयुक्त आहे. डोळ्यांना आणि त्वचेला हितकर आहे. माक्याचा रस सिद्ध करून तयार केलेले भृंगराज तेल केसांच्या वाढीसाठी, केसात कोंडा होणे, टक्कल पडणे, केस पांढरे होणे यावर वापरतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी माक्याचे तेल नियमित डोक्याला लावावे. डोके दुखत असल्यास माक्याचा रस नाकात टाकावा किंवा डोळ्यांना चोळावा.                   काविळीवर माक्याच्या रसाचा किंवा चूर्णाचा खूप उपयोग होतो. सूज आली असल्यास माक्याच्या रसात मिरेपूड घालून द्यावी व सूजेलाही लावावी. भाजलेल्या जखमेवर, किंवा कोणत्याही जखमेवर जखम भरून आल्यानंतर माक्याचा र...

अगस्ती उदय

मंडळी, पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये असलेले काही उल्लेख आपल्याला कळत नाही. उगीच काही तरी दिले असेल म्हणून आपण दुर्लक्ष करतो. जाणकार व्यक्तीने समजावून सांगितले तर ठीक, नाहीतर आपण लक्ष देत नाही. आता हेच पहा ना ! ९ ऑगस्ट रोजी अगस्ती दर्शन असा उल्लेख पंचांगात आणि कॅलेंडरमध्ये आहे. म्हणजे काय, तर आकाशात अगस्ती ता-याचा उदय या दिवशी झाला. अगस्ती तारा हा दक्षिण दिशेला असतो. उत्तरेला जसा ध्रुव तारा तसा दक्षिणेला अगस्ती तारा. वर्षा ऋतूच्या प्रारंभी हा तारा अस्तंगत होतो, दिसत नाही. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उदित होतो. दर वर्षी अगस्ती उदय किंवा दर्शन असा पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये उल्लेख असतो. अर्थात ही कालगणना प्राचीन कालापासून चालत आली आहे. सध्या ऋतूमान बदलल्यामुळे अगस्ती उदय झाला म्हणजे शरद ऋतु सुरु झाला असे मात्र नाही. असो. पण याचा आरोग्याशी, आयुर्वेदाशी काय संबंध ? अगस्ती ता-याच्या उदयाने पाणी शुद्ध होते असा आयुर्वेदात उल्लेख आहे. अगस्ती ता-याच्या किरणांनी पाण्यातील सर्व विषे, दूषित पदार्थ नष्ट होतात, पाणी शुद्ध होते. असे पाणी सर्वांनी पिण्यास योग्य आहे. इतकेच नव्हे तर अगस्तीच्या उदयाने सर्व व...

आभार

मंडळी,  पृष्ठदृष्यांची संख्या ५०,००० च्या वर पोहोचली आहे. आपण केलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.  स्वातंत्र्यदिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

पावसाळा, तब्येत सांभाळा !

     पावसाने जशी अनेक दिवस दडी मारली तशी डॉक्टरांनी पण दडी मारली की काय असे सगळ्यांना वाटत असेल. पण मंडळी, विरहानेच वाचकांचे माझ्यावरचे प्रेम आणि उत्सुकता वाढते, खरे ना ?      वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. तृषार्त धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे. आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे...

जांभूळ

        Black Berry या इंग्रजी नावाने प्रसिद्ध असलेले जांभूळ हे हंगामी फळ आहे. जांभळे, करवंदे ही फळे अस्सल ग्रामीण मेवा आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभळे पिकतात. हल्ली शहरीकरणामुळे जांभळाची झाडे दुर्मिळ झाली आहेत. जंगलात, शेतात बांधाबांधाने पिकणारी जांभळे शहरात हल्ली १०० ते १५० रु. किलो किंवा जास्तच भावाने मिळतात. जांभळाचा मोठा वृक्ष होत असल्याने शेतात व्यापारी तत्त्वावर लागवड करणे अवघड आहे. जांभळाची पाने, फळे, बी, झाडाची साल हे औषधी गुणयुक्त आहे. पाने ही पंचपल्लव या गटात मोडतात. जांभळामुळे शरीरात वातदोष वाढतो.        जांभळापासून घरी जांभूळपाक तयार करतात. अम्लपित्त, कफ, खोकला यावर जांभूळपाक उपयुक्त आहे. तोंड येणे, जिभेला फोड येणे, तोंडात जखमा, चट्टे येणे यावर भरपूर जांभळे खावीत किंवा जांभळाचा रस लावावा. कडुनिंबाप्रमाणेच जांभळाच्या काड्यांनी दात घासावेत. काड्यांचा काढा करून गुळण्या केल्यास मुखरोगांवर उपयोग होतो. मुखाची दुर्गंधी जाते, दात बळकट होतात. घामोळ्यांवर जांभळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात कालवून अंगाला लावावे.  ...

बहावा

Image
मंडळी, बरेच  दिवसांनी आपली भेट होतेय. ह्या रखरखीत उन्हाळ्यात झाडे सुकलेली असताना गुलमोहोर, बहावा ही झाडे मात्र खूप फुललेली असतात. बहावा उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी फुलतो. काही ठिकाणी बहाव्याच्या फुलांची भाजी करतात. याला फळे म्हणजे शेंगा येतात. शेंग चांगली जाड लाटण्यासारखी असते. शेंगेत बिया व मगज असतो.  बहाव्याच्या मगजाचा खूप औषधी उपयोग आहे. मगज सौम्य रेचक आहे. बहावा मगज हा दुधात कोळून साखर घालून रात्री घेतल्यास दुस-या दिवशी शौचास साफ होते. जुलाब मात्र होत नाहीत. कोणत्याही वयाच्या माणसास शौचास साफ होण्यासाठी मगज वापरतात. यापासून तयार केलेल्या आरग्वध कपिला वटीचा उपयोग सौम्य रेचनासाठी उत्तम होतो. गोड, थंड असल्यामुळे पित्तदोषावर खूप उपयुक्त आहे. यकृताच्या कार्याला मगजाच्या सेवनाने उत्तेजना मिळते.  बियांचे चूर्ण मधुमेहवर उपयुक्त आहे.  त्वचारोगांवर बहाव्याच्या पानांचा उपयोग होतो. बहाव्याचा कोवळा पाला वाटून त्वचारोगांवर लावावा.  फुललेल्या बहाव्याचे फोटो खूप छान येतात.

वसंत ऋतूतील प्रकृतीची काळजी

           मंडळी, खास आग्रहास्तव ही पोस्ट पुन्हा देत आहोत.            वसंत ऋतु म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. सूर्याचे उत्तरायण हळूहळू या ऋतूत सुरु होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढते. शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते. वातावरणात थोडीशी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नविन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित, नवचैतन्याने नटलेली भासते. आंब्याला मोहोर येतो. सर्वत्र सुगंधित फुले फुलतात. कोकीळा कुहु कुहु कुंजन करु लागते. अशा प्रकारे सर्व सृष्टीला नवसंजीवन देणारा हा वसंत ऋतु म्हणजे ’ऋतुराज वसंत’ सुरु होतो.              वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे हिवाळ्यात निसर्गत: आणि आहार-विहारामुळे संचित झालेला कफदोष द्रवीभूत होतो, त्याचे विलयन होते. त्यामुळे या ऋतूत कफदोषाचे अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: श्वसनमार्गाचे व्याधी जास्त होतात. उदा. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखेही व्याधी होतात. या ऋतूत भुकेचे प्रम...

बाभूळ

                  ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अशी म्हण प्रसिद्ध आहे. बोरी बाभळी ह्या रानोमाळ उगवणारया काटेरी वनस्पती आहेत. बाभळीचा पाला हा शेळ्या- मेंढ्यांचे आवडते खाद्य आहे.                  बाभूळ ही तुरट रसाची आहे. कडू, तुरट रसाच्या द्रव्यांनी दात घासल्याने दातांचे आरोग्य चांगले रहाते. बाभळीच्या कोवळ्या काड्यांनी दात घासावेत. दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले रहाते. दातांच्या आणि हिरड्यांच्या विकारांवर बाभळीच्या काड्या, साल याच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. गुळण्या कराव्यात म्हणजे तोंडात काढा घेऊन फक्त खळखळ गुळण्या असे नव्हे तर, गुळण्या करण्यापूर्वी तो काढा तोंडात १० ते २० सेकंद धरून ठेवावा. त्यामुळे जास्त चांगला परिणाम मिळतो. तोंड येणे, तोंडात जखम, हिरड्यांचे, दातांचे विकार यावर खूप चांगला उपयोग होतो.                      डिं काचे लाडू सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या लाडूंमध्ये जो डिंक वापरतात तो बाभळीचा डिंक असतो. तांबडा-पांढरा अशा रं...