उपयुक्त वड

       भारतीय संस्कृतीने वर्षातील एका दिवसालाच याचे नाव दिले आहे, ’वटपौर्णिमा’. वडाचा फार मोठा वृक्ष असतो आणि खूप वर्षे टिकतो.  दीर्घायुष्याचे प्रतिक म्हणून वडाचे झाड मानले जाते. झाडाचा बुंधा मोठा डेरेदार असल्याने झाडाला पार बांधतात. वडाला नित्य नव्या पारंब्या फुटत असतात. वड, पिंपळ, औदुंबर हे वृक्ष हिंदूंनी फार पूजनीय मानले आहेत. या झाडांभोवती प्रदक्षिणा घालण्याचा स्त्री, पुरुषांचा प्रघात असे. विशेषत: स्त्रिया तर वडाला नित्य प्रदक्षिणा घालत असत. स्वयंपाक घरातील स्त्रिया घराबाहेर पडून त्यांनी प्रदक्षिणा मारल्यामुळे शरीराला व्यायाम होऊन बाहेरील मोकळी, ताजी हवा मिळण्याची ती सोय असावी. विशेषत: आजच्या प्रदुषणयुक्त आणि टी.व्ही.मय युगात तर याची जास्तच गरज आहे.
         ईच्छित संततीप्राप्तीसाठी ’पुसंवन’ नावाचा विधी आयुर्वेदात वर्णन केला आहे. त्यामध्ये वडाच्या कोवळ्या कोंबांचा वापर करतात. मुलगा असो की मुलगी, जन्मणारे बालक सुदृढ, निरोगी जन्माला यावे यासाठी आयुर्वेदात खूप मार्गदर्शन आहे, त्याविषयी नंतर पाहू. 
      सारखी लघवी होणे, प्रमेह (फक्त मधुमेह नव्हे) यावर वडाच्या पारंब्यांचा उपयोग होतो. तोंडात फोड येणे, तोंड येणे, चट्टे पडणे यावर वडाच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात. लघवी अडणे, थेंब-थेंब होणे, लघवीला आग होणे यावर वडाच्या पानांचा काढा द्यावा. श्वेतप्रदरावर वडाच्या सालींचा काढा द्यावा. मेदोवृद्धीवर मुळांच्या सालीचा काढा द्यावा.
      वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. केस वाढीसाठी, केस काळे होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या तेलाच्या नित्य वापराने केस मृदु, मुलायम, सुंदर होतात .
      

Comments

Unknown said…
वडाच्या झाडाचा औषधी उपयोग कोणत्या दिवशी/वारी करावा?

Popular posts from this blog

हळद

बाभूळ