Posts

हिरडा

          हिरडा म्हणजे हरीतकी ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. सुरवारी हिरडा, बाळ हिरडा, रंगारी हिरडा असे याचे मुख्य प्रकार आहेत.  नास्ती यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी म्हणजे ज्याच्या घरी आई नाही त्याची काळजी हिरडा घेतो. इतके हिरड्याचे महत्त्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे.           भूक न लागणे, अन्न न पचणे, यावर बाळहिरडे खावेत. मलावष्टम्भावर हिरड्याचे चूर्ण रोज रात्री कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मूळव्याधीच्या आजारात संडासाला खडा होणे, कुंथावे लागणे, यावर हिरडा घ्यावे. अम्लपित्तावर हिरडा चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. खोकला, दमा, कफ, यावर हिरडा चूर्ण आणि पिंपळी चूर्ण मधातून चाटून खावे.           हिरडा हा डोळ्यांना फार उपयुक्त आहे. डोळे येणे, डोळ्यांना लाली, सूज, डोळ्यांना आग, डोळ्यांना पाणी येणे, या डोळ्यांच्या विविध विकारांवर सुरवारी हिरड्याच्या क्वाथाने डोळे धुवावेत. हिरडा, बेहेडा, आवळा, यापासून त्रिफळा चूर्ण तयार करतात. रोज रात्री १ चमचा त्रिफळा, १ चमचा मध, २ चमचे तूप असे सेवन केल्यास डोळ्यांचे तेज वाढते. चष्म्याचा नंबर कमी होतो. मध आणि तूप मात्र सम प्रमाणात असू नये. हरीतकी

सीताफळ

                 सीताफळ हे अतिशय थंड आहे. म्हणूनच शीतफळ-शीताफळ-सीताफळ असे याला म्हणतात. सीताफळे साधारणपणे शरद ऋतूच्या शेवटी येतात. मात्र हे फळ थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा. ही फळे गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत.                    सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुलाम्नां लावाव्या. नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.                     लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.   
ब्लॉगवरील सर्व अनुयायी, वाचक, चाहते यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! ही दिपावली आपणा सर्वांना सुख, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना !