Posts

जांभूळ

        Black Berry या इंग्रजी नावाने प्रसिद्ध असलेले जांभूळ हे हंगामी फळ आहे. जांभळे, करवंदे ही फळे अस्सल ग्रामीण मेवा आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभळे पिकतात. हल्ली शहरीकरणामुळे जांभळाची झाडे दुर्मिळ झाली आहेत. जंगलात, शेतात बांधाबांधाने पिकणारी जांभळे शहरात हल्ली १०० ते १५० रु. किलो किंवा जास्तच भावाने मिळतात. जांभळाचा मोठा वृक्ष होत असल्याने शेतात व्यापारी तत्त्वावर लागवड करणे अवघड आहे. जांभळाची पाने, फळे, बी, झाडाची साल हे औषधी गुणयुक्त आहे. पाने ही पंचपल्लव या गटात मोडतात. जांभळामुळे शरीरात वातदोष वाढतो.        जांभळापासून घरी जांभूळपाक तयार करतात. अम्लपित्त, कफ, खोकला यावर जांभूळपाक उपयुक्त आहे. तोंड येणे, जिभेला फोड येणे, तोंडात जखमा, चट्टे येणे यावर भरपूर जांभळे खावीत किंवा जांभळाचा रस लावावा. कडुनिंबाप्रमाणेच जांभळाच्या काड्यांनी दात घासावेत. काड्यांचा काढा करून गुळण्या केल्यास मुखरोगांवर उपयोग होतो. मुखाची दुर्गंधी जाते, दात बळकट होतात. घामोळ्यांवर जांभळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात कालवून अंगाला लावावे.        अतिसार, जुलाब यावर जांभळाच्या सालीचे चूर्ण किंवा रस घ्यावा.

बहावा

Image
मंडळी, बरेच  दिवसांनी आपली भेट होतेय. ह्या रखरखीत उन्हाळ्यात झाडे सुकलेली असताना गुलमोहोर, बहावा ही झाडे मात्र खूप फुललेली असतात. बहावा उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी फुलतो. काही ठिकाणी बहाव्याच्या फुलांची भाजी करतात. याला फळे म्हणजे शेंगा येतात. शेंग चांगली जाड लाटण्यासारखी असते. शेंगेत बिया व मगज असतो.  बहाव्याच्या मगजाचा खूप औषधी उपयोग आहे. मगज सौम्य रेचक आहे. बहावा मगज हा दुधात कोळून साखर घालून रात्री घेतल्यास दुस-या दिवशी शौचास साफ होते. जुलाब मात्र होत नाहीत. कोणत्याही वयाच्या माणसास शौचास साफ होण्यासाठी मगज वापरतात. यापासून तयार केलेल्या आरग्वध कपिला वटीचा उपयोग सौम्य रेचनासाठी उत्तम होतो. गोड, थंड असल्यामुळे पित्तदोषावर खूप उपयुक्त आहे. यकृताच्या कार्याला मगजाच्या सेवनाने उत्तेजना मिळते.  बियांचे चूर्ण मधुमेहवर उपयुक्त आहे.  त्वचारोगांवर बहाव्याच्या पानांचा उपयोग होतो. बहाव्याचा कोवळा पाला वाटून त्वचारोगांवर लावावा.  फुललेल्या बहाव्याचे फोटो खूप छान येतात.

वसंत ऋतूतील प्रकृतीची काळजी

           मंडळी, खास आग्रहास्तव ही पोस्ट पुन्हा देत आहोत.            वसंत ऋतु म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. सूर्याचे उत्तरायण हळूहळू या ऋतूत सुरु होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढते. शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते. वातावरणात थोडीशी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नविन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित, नवचैतन्याने नटलेली भासते. आंब्याला मोहोर येतो. सर्वत्र सुगंधित फुले फुलतात. कोकीळा कुहु कुहु कुंजन करु लागते. अशा प्रकारे सर्व सृष्टीला नवसंजीवन देणारा हा वसंत ऋतु म्हणजे ’ऋतुराज वसंत’ सुरु होतो.              वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे हिवाळ्यात निसर्गत: आणि आहार-विहारामुळे संचित झालेला कफदोष द्रवीभूत होतो, त्याचे विलयन होते. त्यामुळे या ऋतूत कफदोषाचे अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: श्वसनमार्गाचे व्याधी जास्त होतात. उदा. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखेही व्याधी होतात. या ऋतूत भुकेचे प्रमाण कमी होते. म्हणून पचायला हलके पदार्थ आहारात असावेत. तसेच नविन तयार झालेले धान्य लगेचच खाऊ नय