आला उन्हाळा, तब्येत सांभाळा !!!


आला उन्हाळा, तब्येत सांभाळा !!!


नमस्कार मंडळी !
मोठा झालेला दिवस, दिवसभर असणारा उकाडा, सारखा घाम येणे, दिवसभर उत्साह न वाटणे, यामुळे उन्हाळ्याचा आपल्याला कंटाळा येतो. तर विविध शीतपेये, आईस्क्रीम, मुलांची मोठी सुटी, आमरसाच्या मेजवान्या आणि लग्नसराई यामुळे दुसरीकडे उन्हाळा हवाहवासाही वाटतो. पण या काळात आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.  

उन्हाळ्यात उन्हात जास्त हिंडू नये. उन्हाच्या वेळी बाहेर जायचे झाल्यास डोक्याला टोपी किंवा रुमाल बांधून जावे. उन्हाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्यामुळे पाणी उकळून प्यावे किंवा फिल्टर करून प्यावे. पिण्याचे पाणी उकळून नंतर वाळा, मोग्र्याची फुले असे सुगंधी पदार्थ टाकून थंड करून प्यावे. प्रकृतीनुसार ज्यांना मानवते त्यांनी थंड पाणी प्यावे. फ्रीजपेक्षा माठात थंड केलेले पाणी अधिक चांगले. आईस्क्रीम, बर्फ, कृत्रिम शीतपेये यांचा वापर शक्यतो टाळावा. त्याऐवजी थंडगार लिंबू सरबत, आमसुलाचे सरबत, कैरीचे पन्हे, शहाळ्याचे पाणी, गोड ताक, ताजी नीरा यासारख्या नैसर्गिक शीतपेयांचा भरपूर वापर वापर करण्यास हरकत नाही. जेवणात कांद्याचा भरपूर वापर करावा. द्राक्षे, खरबूज, टरबूज, आंबा, ह्यासारखी फळे, काकडी यांचाही वापर करावा. तळलेले पदार्थ, जास्त तिखट, मिठाचे पदार्थ, आंबट पदार्थ, मसालेदार पदार्थ, उष्ण पदार्थ, पचायला जड पदार्थ खाऊ नयेत. कुळीथ, बाजरी, लसूण, उडीद यासारखे पदार्थ उन्हाळ्यात खाऊ नयेत. गहू, तांदूळ, ज्वारी, मूग ह्या धान्यांचा वापर करावा.

या ऋतूत आणखी एक उपयुक्त धान्य म्हणजे सातू किंवा यव होय. पूर्वीच्या काळी विशेषकरून उन्हाळ्यात सकाळी न्याहारीसाठी सातूचे पीठ खात असत. भाजलेल्या सातूचे पीठ करून ते दुधाशी किंवा पाण्याशी मिश्र करून त्यात चवीपुरते गूळ किंवा साखर टाकून खात असत. हल्ली काही ठिकाणी  सातूऐवजी गहू वापरतात. सातू हे थंड असून पचायलाही हलके आहेत. तसेच शक्तीवर्धकही आहेत. उन्हाळ्यात उष्णता वाढलेली असते, भूक कमी झालेली असते. अशा वेळी थंड आणि पचायला हलक्या अशा सातूच्या पिठाचे नियमित सेवन करावे. याच सातूपासून तयार केलेले कृत्रिम पॅकबंद टॉनिक्स, माल्टयुक्त पेये, औषधे घेण्यापेक्षा हे सातूचे पीठ घरच्या घरी घेणे केव्हाही चांगलेच. तसेच पूर्वी लाह्याचे पीठ सुद्धा उन्हाळ्यात खाण्याची प्रथा असे. लाह्या ह्या पचायला अतिशय हलक्या आणि थंड आहेत. अर्थात ह्या साळीच्या लाह्या असाव्यात. सातू, साळीच्या लाह्या ही द्रव्ये तर्पण करणारी म्हणून आयुर्वेदात वर्णिलेली आहेत. उन्हाळ्यात नाचणीचे आंबील करून घेतात. तेही चांगले आहे. नाचणी ही थंड व हलकी आहे.

उकाड्याच्या वेळी पंखा, AC चा वापर करण्यास हरकत नाही. पण पंख्याचा वारा थेट अंगावर घेऊ नये. तसेच उन्हातून आल्यावर ताबडतोब पंख्याखाली किंवा AC मध्ये बसू नये, लगेच थंडगार पाणी पिऊ नये.  थोडा वेळ मध्ये जाऊ द्यावा. नंतर पाणी प्यावे.

सकाळच्या वेळी हलका व्यायाम करावा. व्यायाम अगदी थोडा (म्हणजे घाम येईपर्यंत) करावा. पोहण्याचा सराव करण्यास उन्हाळा हा चांगला ऋतू होय. उन्हाळ्यात जाड, अंगास घट्ट बसणारे कपडे वापरू नयेत. कपडे मऊ, सुती आणि शक्यतो शुभ्र किंवा फिक्या रंगाचे असावेत.

डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल्सचा वापर जरूर करावा. पण हे गॉगल्स गडद रंगाचे असू नयेत, सौम्य रंगाचे असावेत.

आयुर्वेदानुसार उन्हाळा हा आदानकाल सांगितलेला आहे. ह्या काळात शरीरबल कमी होते, शरीरातील स्निग्धतेचे शोषण होते.

आतापर्यंत आपण उन्हाळ्यातील सामान्य आहार विहार यांची माहिती घेतली. आता उन्हाळ्यात होणा-या व्याधींवर करायच्या प्राथमिक उपायांची माहिती घेऊ या. अर्थात ह्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या उपाय योजना आहेत. अधिक उपचारांसाठी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

1.       ताप- उन्हाळ्यातील तापाची अनेक कारणे असू शकतात. घरच्या घरी प्राथमिक उपचार करताना ताप उतरविण्याचे उपचार करावेत. रुग्णाला ऊन, उन्हाच्या झळा लागणार नाहीत अशा थंड ठिकाणी ठेवावे. पण एकदम पंख्याखाली, AC मध्ये ठेवू नये. खूप ताप असल्यास ताप कमी करण्यासाठी स्पंजिंग करावे. कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. तापाचे मूळ कारण दूर करण्यासाठी तज्ञांकडून औषधोपचार करावेत.

2.       मूर्च्छा – उन्हाळ्यात अतिशय उन्हामुळे चक्कर, घेरी येणे, भोवळ येणे, प्रसंगी मूर्च्छित होणे असे संभवते. अशा वेळी रुग्णाला सावलीच्या ठिकाणी हलवावे, कृत्रिम वारा घालावा. कांदा फोडून हुंगवावा. लगेच तज्ञांचा सल्ला घ्यावा.

3.       गोवर, कांजिण्या- लहान मुलांमध्ये हे आजार उन्हाळ्यात आढळतात. ताप कमी करण्यासाठी लाक्षणिक उपचार करावेत. तसेच पित्तदुष्टीची लक्षणे कमी करण्यासाठी ‘परीपाठादी काढा ह्यासारख्या औषधांचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने करावा.

4.       दाह- उन्हामुळे शरीराची, डोळ्यांची आग होणे, खूप तहान लागणे, लघवीला त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. अशा वेळी उन्हात फिरू नये, थंड ठिकाणी राहावे, वाळायुक्त थंड, सुगंधी पाणी प्यावे.

अशा प्रकारे वर सांगितलेल्या उपायांप्रमाणे आहार-विहारांचे पालन केल्यास, शरीराची काळजी घेतल्यास उन्हाळा आपणास नक्कीच सुखकर होईल.



-          लेखक- डॉ.  गोपाल मेघ:श्याम सावकार

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड