आवळा

"आवळा देऊन कोहळा काढणे" अशी म्हण प्रचारात असली तरी आवळा देणे म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती गमावणे   होय. तुळशीच्या लग्नाचे दिवस सुरु झाले की चिंचा,  बोरे, आवळे अशा  मुलांच्या आवडत्या रानमेव्याचेही दिवस सुरु होतात. आपण आई बाबा मात्र 'नको खाऊ, सर्दी खोकला होईल' म्हणून त्यांना दाटत असतो. आवळे अष्टमी ही याच दिवसात येते. आवळा हे हविष्याचे द्रव्य म्हणून ओळखले जाते. च्यवनप्राश खाऊन तरूण झालेल्या च्यवन ऋषींची हकीकत सर्वांना माहितीच आहे.
आवळा हा रसायन कार्य करणारा आहे. रूढ अर्थाने शरीर तरूण बनविणे असा अर्थ निघत असला तरी शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म पेशींची झीज कमी करणे, degenerative changes कमी करणे असाही रसायन शब्दाचा अर्थ होतो. अर्थात च्यवन प्राशाच्या खपाने अनेक औषधी कंपन्या गब्बर झाल्या असल्या तरी खात्रीशीर च्यवनप्राश घ्यावा. च्यवनप्राश अनेक स्वरूपात उपलब्ध आहे. granules , chewable tabs , chocklets अश्या स्वरूपात असले तरी पारंपारिक पद्धतीने तयार केलेला जास्त परिणामकारक ठरतो.
आवळा हा 'परं वृष्य' सांगितलेला आहे. च्यवनांसारख्या म्हाताऱ्या ऋषींना याच्या सेवनाने कामशक्ती मिळाली असे वर्णन आढळते.

आमलकी या नावाने त्रिफला चूर्णातील महत्त्वाचे द्रव्य असणारा हा आवळा पाच रसांनीयुक्त आहे. त्यामध्ये लवण रस नाही.  शरीरातील पचनास हा उत्तम मदत करतो. थंड असल्याने पित्तशामक आहे. आम्लपित्त, आंबट ढेकर येणे यावर उत्तम उपयोग होतो. घरगुती उपचारात पित्तावर मोरावळा देतात हे आपल्याला माहितीच आहे. केसांच्या तक्रारी, केस पांढरे होणे, गळणे, यावर याचा चांगला उपयोग होतो. सिद्ध तेलांमध्ये याचा उपयोग करतात.
शरीरातील पित्ताचे व्याधी यावर याचा चांगला उपयोग होतो. यकृताचे व्याधी यावरही उपयोग होतो. मधुमेहावर आवळा वाळवून केलेले आवलाकाठीचे चूर्ण आणि दारूहळद यांचा चांगला उपयोग होतो. अर्थात वैद्यकीय सल्ल्यानेच याचा वापर करावा.
व्हिटामिन क आणि antioxidants भरपूर स्रोत असणारे हे फळ आहे.  हिवाळ्यात निसर्ग मानवाला शक्ती प्रदान करीत असतो. त्या शक्तीस्वरूप मिळालेले हे आवळा फळ नवजीवन देते.

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड