Posts

आभार

             मंडळी, आपण सर्व सुजाण वाचकांनी माझ्या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादामुळे पेज व्हिव्युज हे २५००० च्या वर गेले आहेत. व्यवसायामुळे माझे अनियमित लिखाण, वाचकांच्या ई पत्राला लवकर उत्तर न देणे, ब्लॉगची साधी सरळ भाषा, ब्लॉगला सजावट नसणे, किंचित लाजाळूपणामुळे स्वत:चा उदो उदो न करणे, माझ्या या सर्व त्रुटी आपण पोटात घालून मला जो प्रतिसाद दिला, जे प्रेम दिले याबद्दल आपले शतश: आभार !              दोन बायका सांभाळणा-यांची काय हालत होत असेल हे दोन ब्लॉग चालविताना मला कळले. त्यामुळे दुस-या ब्लॉगकडे खूप दुर्लक्ष्य झाले. याबद्दल क्षमस्व !            यापुढेही आपण असाच प्रतिसाद देऊन माझा उत्साह वाढवावा ही विनंती.  

बदाम

                         सुकामेवा म्हणून बदाम प्रसिद्ध आहेत. बदाम हे अतिशय पौष्टीक आणि शक्तीवर्धक आहेत. बदामाचे तेल सुद्धा निघते. हे तेल सौंदर्यप्रसाधनांमध्ये सौंदर्यवृध्दीसाठी, त्वचा कांतिमान होण्यासाठी वापरतात. हिवाळ्यात पौष्टीक खाद्य म्हणून बदामाचा शिरा खातात. डोकेदुखी, डोके जड होणे, अर्धशिशी यावर बदाम्याच्या शि-याचा खूप चांगला उपयोग होतो.                   आयुर्वेदानुसार बदामामुळे मज्जाधातूची वृध्दी होते. बदाम हे बुध्दीच्या वाढीसाठी खातात. बुध्दीची धारणाशक्ती वाढावी, वाचलेले किंवा ऎकलेले लवकर लक्षात यावे, एकदा लक्षात राहिलेले जास्त काळ लक्षात रहावे, जास्त माहिती लक्षात ठेवण्याचे क्षमता वाढावी यासाठी बदामाचा खूप उपयोग होतो.                   बदामामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते. तसेच प्रथिने आणि स्निग्ध पदार्थही असतात. म्हणून हिवाळ्यात बदामाचे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. डिंकाच्या लाडूत बदाम घालतात. मात्र बदाम ऊष्ण व जड असल्याने एकाच वेळी अति प्रमाणात खाऊ नयेत. 

शबरीची बोरे

शबरीने आपली उष्टी बोरे पावन करून ठेवलेली आहेतच. प्रभु श्रीरामांना मोठ्या भक्तीने उष्टी बोरे खाऊ घालणारया शबरीने बोरं मात्र अजरामर करून ठेवली आहेत. तसेच परीक्षित राजाला सर्पदंश हा बोरातील अळीच्या रूपाने आलेल्या तक्षक सर्पामुळे झाला, अशी कथा आहे.                  चिंचा, बोरे हा तर लहान मुलांचा आवडता मेवाच. तुळशीच्या लग्नापासून बाजारात बोरं यायला सुरुवात होते. आकाराने मोठी, मधुर अशी मेहरूणची बोरं प्रसिद्धच आहेत.  सारखी खा-खा होणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे अशा भस्मक रोगावर बोराच्या बियांचे चूर्ण घ्यावे. अतिसार, संडासवाटे खूप पातळ जुलाब होणे, आव यावर बोराच्या मुळ्या आणि तीळ यांचे वेगवेगळे कल्क करून नंतर ते एकत्र करून गायीच्या दुधातून घ्यावे. संडासवाटे रक्त पडत असल्यास बोराच्या मुळ्यांचा चांगला उपयोग होतो. केसतोडा झाला असल्यास तेथे बोराचा पाला चोळावा किंवा पाल्याचा रस लावावा. उलट्या होत असल्यास बोराच्या बियांचे चूर्ण मधातून चाटवावे. शरीराच्या कोणत्याही भागाची आग होत असल्यास बोरीचा पाला चोळावा किंवा पाल्याचा रस लावावा. बोर हे तहान भागविणारे, पित्तशामक, बल्य आहे.