Posts

आंबा

    आंबा हे अमृतफळ आहे. कोंकण प्रदेशाला आंबा, फणस यांनी समृद्ध केले आहे. ग्रीष्म ऋतू सुरु झाला की घरोघर आमरसाच्या मेजवान्या होतात. आंब्याबरोबर आतली कोयसुद्धा औषधी आहे. मूळव्याध झाल्यावर रक्त पडणे, रक्तप्रदर, अतिसार, जुलाब यावर आंब्याच्या कोयीतील बियांचे चूर्ण मधातून द्यावे. पिकलेला आंबा थंड, बल वाढविणारा आहे. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कैरीचे पन्हे करून पितात. कैरीचा गर, गूळ यापासून कैरीचे पन्हे करतात. हे पन्हे तहान भागविणारे, दाहशामक, उत्साहवर्धक आहे. उन्हाळ्यात नुसत्या पाण्याने समाधान न झाल्यास कैरीचे पन्हे घ्यावे. कैरीचे लोणचे मात्र उन्हाळ्यात खाऊ नये, ते पावसाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी थोडे खाण्यास हरकत नाही.      आंबा हे एक फळ असे आहे की त्याचा रस दुध मिसळून खाण्यास हरकत नाही. असा रुचकर, शक्तीवर्धक आंबा आहे.    

कुमारी / कोरफड

   कोरफड ही नित्य वापरातील वनस्पती आहे. ती सदैव, ताजी, टवटवीत दिसते म्हणून तिला 'कुमारी' असेही म्हणतात. यकृत, प्लीहेच्या सर्व रोगांवर कोरफड अतिशय उत्तम आहे. यकृताला सूज येणे, कावीळ, बिलीरूबिनचे प्रमाण वाढणे यावर कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. कोरफड यकृताचे टोनिक आहे. तसेच प्लीहावृद्धी, रक्त कमी होणे यावरही कोरफडीचा खूप चांगला उपयोग होतो. काविळीवर कोरफडीचा रस, कोरफडीपासून तयार केलेल्या कुमारी आसवाचा वापर करतात.     डोळे येणे, डोळ्यांची आग होणे यावर कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. कफ होणे, खोकला यावर कोरफडीचा गर मधातून द्यावा. केसांच्या वाढीसाठी, केस मुलायम आणि तजेलदार व्हावेत म्हणून कोरफडीचा गर केसांना लावतात.      सौन्दर्यासाठी, त्वचा ताजीतवानी दिसावी, चेहर्यावरचे डाग, पुळ्या कमी व्हाव्यात  म्हणून कोरफडीचा गर लावावा. कोरफड रक्तशुद्धीकर असून ताप कमी करणारी, पित्तनाशक, भूक वाढवणारी आहे.

वाळा

   उन्हाळ्यात माठाच्या पाण्यात वाळा घातला असता ते पाणी थंड व सुगंधी होते. त्या पाण्याने तहान भागते. वाळ्याचे पडदे खिडक्या, दारे, गाड्या यांना लावतात. पिवळा वाळा, काळा वाळा असे वाळ्याचे दोन प्रकार आहेत.        वाळा हा अतिशय थंड आहे. अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. लघवीला आग, जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे  यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो.     मुलांचा घोळाणा फुटणे, विशेषत: उन्हाळ्यात काही मुलांना हा त्रास खूप होतो. यावर वाळ्यापासून तयार केलेले 'उशीरासव' इतर औषधांबरोबर वापरतात. घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात. त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात. त्यामुळे त्वचा टवटवीत होते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्त्राव यावर वैद्यांच्या सल्ल्याने वाळ्याचा उपयो