शरदाचे चांदणे १
शरदाच्या चांदण्याविषयी साहित्यामध्ये विपुल माहिती आढळते. शरद ऋतूमध्ये निसर्ग मोठा सुंदर भासतो. नुकताच पावसाळा संपल्यामुळे सर्वत्र हिरवळ, फुललेली रंगीबेरंगी फुले, यामुळे सृष्टी नवचैतन्याने नटलेली असते. दिवसा आकाशामध्ये शुभ्र ढग विहार करीत असतात, तर रात्री आकाश स्वच्छ, निरभ्र असते. असे निरभ्र आकाश, चमचमत्या चांदण्या, चंद्र यामुळे पडलेले चांदणे मोठे मनोहर भासते. या सुरुवातीच्या काळात थोडा पाऊस असतो. परंतु जसेजसे दिवस जाऊ लागतात, तसतसा पाऊस कमी होतो. शरद ऋतूच्या उत्तरार्धात पाऊस जवळजवळ नसतोच. दिवसा हवेतील ऊष्मा वाढू लागतो. त्यामुळे उकाडा असह्य होतो. 'ऑक्टोबर हीट' म्हणतात ती हीच. रात्री मात्र टिपूर चांदणे पडते. रात्री हवाही थंड, आल्हाददायक असते. म्हणून अशा वेळी रात्री उशिरापर्यंत चांदण्यात शिळोप्याच्या गप्पा रंगायच्या. रात्री चांदण्यात गच्चीवर थंड, आल्हाददायक हवेत शांत झोप लागते. पहाटे मात्र थंडी, दव पडते. दिवसा उकाडा वाढल्याने पावसाळ्यात संचित झालेल्या पित्तदोषाचा प...