Posts

Showing posts from May, 2012

जांभूळ

        Black Berry या इंग्रजी नावाने प्रसिद्ध असलेले जांभूळ हे हंगामी फळ आहे. जांभळे, करवंदे ही फळे अस्सल ग्रामीण मेवा आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभळे पिकतात. हल्ली शहरीकरणामुळे जांभळाची झाडे दुर्मिळ झाली आहेत. जंगलात, शेतात बांधाबांधाने पिकणारी जांभळे शहरात हल्ली १०० ते १५० रु. किलो किंवा जास्तच भावाने मिळतात. जांभळाचा मोठा वृक्ष होत असल्याने शेतात व्यापारी तत्त्वावर लागवड करणे अवघड आहे. जांभळाची पाने, फळे, बी, झाडाची साल हे औषधी गुणयुक्त आहे. पाने ही पंचपल्लव या गटात मोडतात. जांभळामुळे शरीरात वातदोष वाढतो.        जांभळापासून घरी जांभूळपाक तयार करतात. अम्लपित्त, कफ, खोकला यावर जांभूळपाक उपयुक्त आहे. तोंड येणे, जिभेला फोड येणे, तोंडात जखमा, चट्टे येणे यावर भरपूर जांभळे खावीत किंवा जांभळाचा रस लावावा. कडुनिंबाप्रमाणेच जांभळाच्या काड्यांनी दात घासावेत. काड्यांचा काढा करून गुळण्या केल्यास मुखरोगांवर उपयोग होतो. मुखाची दुर्गंधी जाते, दात बळकट होतात. घामोळ्यांवर जांभळाच्या बियांचे चूर्ण पाण्यात कालवून अंगाला लावावे.  ...

बहावा

Image
मंडळी, बरेच  दिवसांनी आपली भेट होतेय. ह्या रखरखीत उन्हाळ्यात झाडे सुकलेली असताना गुलमोहोर, बहावा ही झाडे मात्र खूप फुललेली असतात. बहावा उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी फुलतो. काही ठिकाणी बहाव्याच्या फुलांची भाजी करतात. याला फळे म्हणजे शेंगा येतात. शेंग चांगली जाड लाटण्यासारखी असते. शेंगेत बिया व मगज असतो.  बहाव्याच्या मगजाचा खूप औषधी उपयोग आहे. मगज सौम्य रेचक आहे. बहावा मगज हा दुधात कोळून साखर घालून रात्री घेतल्यास दुस-या दिवशी शौचास साफ होते. जुलाब मात्र होत नाहीत. कोणत्याही वयाच्या माणसास शौचास साफ होण्यासाठी मगज वापरतात. यापासून तयार केलेल्या आरग्वध कपिला वटीचा उपयोग सौम्य रेचनासाठी उत्तम होतो. गोड, थंड असल्यामुळे पित्तदोषावर खूप उपयुक्त आहे. यकृताच्या कार्याला मगजाच्या सेवनाने उत्तेजना मिळते.  बियांचे चूर्ण मधुमेहवर उपयुक्त आहे.  त्वचारोगांवर बहाव्याच्या पानांचा उपयोग होतो. बहाव्याचा कोवळा पाला वाटून त्वचारोगांवर लावावा.  फुललेल्या बहाव्याचे फोटो खूप छान येतात.