मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५
सर्व वाचकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

सोमवार, २० जुलै, २०१५

कापूर


          'कापूर' हा अतिशय पांढरा शुभ्र असतो. तो अतिशय थंड आहे. भगवान श्री शंकर कापराच्या रंगाचे आहेत म्हणून त्यांना कर्पूरगौर म्हणतात. कोणत्याही देवतेची आरती झाल्यानंतर कर्पुरारती लावण्याची प्रथा आहे. कापूर जाळला असता हवेतील रोगकारक जंतू नाहीसे होतात. कापूर उडनशील आहे. तो उघडा ठेवला असता उडून जातो. म्हणून तो बंद डब्यात ठेवावा.

         कापराच्या अनेक जाती आहेत.त्यात भीमसेनी कापूर श्रेष्ठ आहे. बाजारात जो सध्या कापूर मिळतो, तो अस्सल कापूर नव्हे. तो रासायनिक आहे. अस्सल भीमसेनी कापूर काष्ठौषधीच्या दुकानात मिळतो. कापूर थंड आहे. कापराचे तेल कोथ (कुजणे) नाशक आहे. वेदनाशमनासाठी कापराचे तेल वापरतात. तसेच इसबासारख्या त्वचा विकारांवर हे तेल वापरतात. कापूर डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असल्याने डोळ्यांच्या औषधात कापूर वापरतात. दाढदुखी, दात किडणे, सुजणे, दंतरोग यावर कापूर वापरतात. हल्ली लोकप्रिय झालेली विविध वेदनाशामक मलमे, औषधे, सर्दीवरील औषधे, यामध्ये कापूर असतो. कापराच्या झाडाच्या चिकाचा कापूर म्हणून वापर करतात.
         , सर्दी, खोकला, घशाचे आजार, आवाज बसणे यावर कापराचा उपयोग होतो. हृदयरोगावर याचा उपयोग होतो. संधिवात, अंगदुखी, डोकेदुखी यावर कापूर वापरतात. कर्पूरासव हे औषध प्रसिद्धच आहे. मात्र कापराच्या अतिवापराने मळमळणे, डोकेदुखी, रुक्षता हे होऊ शकते. म्हणून वैद्यकीय सल्ल्यानेच याचा थेट वापर करावा.


सोमवार, ३० मार्च, २०१५

शतावरी

         
           शतावरी वनस्पतीच्या मुळ्या जास्त औषधी असतात. या मूळ्याचे चूर्ण, स्वरस, काढा औषधात वापरतात. शतावरी ही उत्तम शक्तीवर्धक आहे. एकूणच शरीराचे बल शतावरीने वाढते. अशक्तपणा, उत्साह न वाढणे, यावर शतावरीचे चूर्ण रोज दुधाबरोबर घ्यावे. त्यामुळे बलवृद्धी होऊन रोगप्रतिकारशक्तीही उत्तम वाढते. शरीरयष्टी बारीक असणे, वजन न वाढणे, यावर शतावरी चूर्ण घ्यावे.
        शतावरीच्या सहाय्याने तेल, तूप सिध्द करतात. शतावरीच्या तेलाने मालीश केली असता वजन वाढते. शतावरी घृताचे नियमित सेवन केले असता बल प्राप्त होते. आम्लपित्त, घशाशी जळजळ, त्यामुळे पोटात दुखणे यावर शतावरी चूर्ण घ्यावे. तसेच अल्सरचा त्रास असल्यास शतावरी चूर्ण तुपातून घ्यावे. त्यामुळे पेप्टेक अल्सर बरा होण्यास मदत होते.
          शतावरी कल्प तर प्रसिद्धच आहे. ज्या काही औषधांमुळे आयुर्वेद प्रत्येक घरात आहे त्यापैकी एक म्हणजे शतावरी कल्प. याचा मुख्य उपयोग हा सध्या प्रसुतीनंतर अंगावर नियमित व भरपूर दूध येण्यासाठी होत असला तरी तो सर्वांनी दुधाबरोबर शक्तीवर्धक म्हणून घावा. लहान मुलांनाही शक्तीवर्धक पेय म्हणून द्यावे. गर्भार अवस्थेपासून ते प्रसुतीनंतर ६ महिन्यांपर्यंत नियमित घावा. 

रविवार, २२ मार्च, २०१५

वसंत ऋतूतील काळजी

मंडळी, खास आग्रहास्तव ही पोस्ट पुन्हा देत आहोत.


           वसंत ऋतु म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. सूर्याचे उत्तरायण हळूहळू या ऋतूत सुरु होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढते. शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते. वातावरणात थोडीशी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नविन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित, नवचैतन्याने नटलेली भासते. आंब्याला मोहोर येतो. सर्वत्र सुगंधित फुले फुलतात. कोकीळा कुहु कुहु कुंजन करु लागते. अशा प्रकारे सर्व सृष्टीला नवसंजीवन देणारा हा वसंत ऋतु म्हणजे ’ऋतुराज वसंत’ सुरु होतो. 
            वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे हिवाळ्यात निसर्गत: आणि आहार-विहारामुळे संचित झालेला कफदोष द्रवीभूत होतो, त्याचे विलयन होते. त्यामुळे या ऋतूत कफदोषाचे अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: श्वसनमार्गाचे व्याधी जास्त होतात. उदा. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखेही व्याधी होतात. या ऋतूत भुकेचे प्रमाण कमी होते. म्हणून पचायला हलके पदार्थ आहारात असावेत. तसेच नविन तयार झालेले धान्य लगेचच खाऊ नये. कारण त्यामुळे कफ दोष वाढतो. एक वर्ष जुने झालेले धान्य सेवन करावे. किंवा अगदीच नाईलाज असेल तर नविन धान्य भाजून घेऊन मग त्याचे सेवन करावे. 
            या ऋतूत सुरुवातीस महाशिवरात्र येते. महाशिवरात्रीला कवठ फळाचे सेवन करतात. खरे तर कवठासारख्या तुरट रसाच्या फळाचे सेवन या ऋतूत नेहमी करावे. या ऋतूत गुढीपाडवा येतो. त्या दिवशी कडुनिंबाची पाने, गूळ, आले, इ. पासून चटणी करतात. ही चटणी कफनाशक, आरोग्यवर्धक आहे. कडुनिंबाची पाने वसंत ऋतूत नियमित खावीत. आहारात हिरव्या पालेभाज्या भरपूर वापराव्यात. पण भाज्या स्वच्छ धुवून वापराव्यात. वांगी, मुळा, लसूण, आले, तसेच मसाल्याच्या पदार्थांचा आहारात वापर करावा. अशा वापरामुळे भुकेचे प्रमाण वाढते. तूप, लोणी कमी खावे. त्याऐवजी तेलाचा वापर करावा. मधाचे नियमित सेवन करावे. त्यामुळे वाढलेला कफ दोष कमी होतो. आले किंवा सुंठ घालून ताक भरपूर प्यावे. दही मात्र अजिबात खाऊ नये. जड, स्निग्ध पदार्थ, गोड पदार्थ, पक्वान्ने, तळलेले पदार्थ या ऋतूत खाऊ नयेत. पचण्यास हलका आहार, तोही कमी प्रमाणात घ्यावा. जेवताना दोन घास कमी खावेत. विशेषतः रात्रीचे जेवण हलके व लवकर घ्यावे. दुपारचेही भोजन माध्यान्हसमयीच घ्यावे. 
            या ऋतूत उकळून गार केलेले पाणी वापरावे. ह्या काळात उन्हाळ्याची चाहूल लागते म्हणून लगेचच माठाचे, फ्रीजचे पाणी, थंड पदार्थ घेण्यास सुरुवात करू नये. सुरुवातीला साधेच पाणी प्यावे. बर्फ, आईस्क्रीम, कुल्फी, शीतपेये घेऊ नयेत. गार पदार्थांचे सेवन हळूहळू वाढवावे. उन्हातून आल्यावर एकदम पाणी पिऊ नये. अल्प वेळाने शांतपणे पाणी प्यावे. या ऋतूत भूक कमी झालेली असते. अशा वेळी खूप पाणी पिल्यास भूक आणखीनच कमी होते. म्हणून भारतीय संस्कृतीत उन्हातून आल्यावर पाणी आणि उष्ण, मधुर गुणाच्या गुळाचा खडा देण्याची प्रथा असे. 
            पंख्याचा वारा अंगावर घेऊ नये. पंखाची दिशा शरीरापासून दूर असावी. उन्हातून आल्यावर लगेच ए.सी. किंवा कूलरमध्ये बसू नये. सकाळी वातावरणात थोडा गारवा असतो. त्यामुळे सकाळी काम करण्यास उत्साह वाटतो. पण दुपारी उन्हामुळे काम करावेसे वाटत नाही. दुपारी आळस भरतो, झोपावेसे वाटते. परंतु दुपारी अजिबात झोपू नये. व्यायाम कमी प्रमाणात करावा. सकाळी लवकर उठून दिनचर्येस सुरुवात करावी. खूप गरम किंवा गार पाण्याने स्नान करू नये. स्नानासाठी कोमट पाणी वापरावे.
            आयुर्वेदाने या ऋतूत 'वमन' हा पंचकर्मांपैकी एक विधी करण्यास सांगितलेला आहे. कफदोषाचे व्याधी होऊ नयेत म्हणून वमन करावे. शरीरातील कफदोष बाहेर काढण्यासाठी उलटीचे औषध दिले जाते. निरोगी व्यक्तींसहित सर्वांनी (अपवाद वगळता) तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली हे वमन कर्म करवून घ्यावे. अंगाला स्नेहन, स्वेदन करवावे. 
            वसंत ऋतूच्या शेवटी  जसजसे उन वाढेल तसतसे हळूहळू  माठाचे पाणी पिणे, पंखा, ए.सी. यांची सवय वाढविण्यास हरकत नाही.
            अशा प्रकारे आपण आहार विहारांचे पालन केल्यास हा ऋतू आपल्या आयुष्याला नवसंजीवनी देणारा ठरेल.     

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

शिशिरातील काळजी
महाराष्ट्रात सध्या शहरांचा विकास सध्या जोरात सुरु आहे. उंच इमारतिंबरोबरच रस्ते, उड्डाणपूल, यांची कामे जोरात सुरु आहेत. रस्त्यांच्या कामांमुळे, वेगवेगळ्या कारणांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. वातावरणात उडणारी धूळ, थंडी, धुक्यामुळे धूलीकण जमिनीलगतच्या वातावरणात जास्त वेळ राहतात. तसेच सध्या शिशिर ऋतू सुरु असल्याने वृक्षांची पानगळ सुरु आहे. ही गळालेली पाने, पालापाचोळा, रस्त्याच्या कडेला जाळला जातो. त्याचाही धूर वातावरणात मिसळतो. हे धुलीकण, धूळ, धूर श्वासोच्छ्वासावाटे फुफ्फुसात, नाकात, जाऊन त्यामुळे विविध आजार होऊ शकतात.
रस्त्यावरील खड्डे, खाचखळगे यामुळे मानदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार होऊ शकतात. असलेले आजार वाढतात.
धूळ, धूर यामुळे असात्म्यताजन्य विकार बळावतात. सर्दी, शिंका, घसा दुखणे हे आजार होतात. दमा असल्यास दम्याचा वेग तीव्र होतो. लहान मुलांनाही याचा त्रास होतो. डोळ्यात कचरे जाणे, धूळ जाणे, डोळे लाल होणे, पाणी येणे असे डोळ्यांचेही आजार होतात.
यावर पुढील काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतील.
सर्दी, शिंका, खोकला- 
धूर, धुळीमुळे पुष्कळांना याचा त्रास होतो. किरकोळ वाटत असला तरी जुना झाल्यावर त्रासदायक ठरतो. यावर उपाय म्हणून बाहेर पडताना दोन्ही नाकपुड्यांना आतून तिळाच्या तेलाचे बोट लावावे. तसेच नाकाला, तोंडाला रुमाल बांधावा. वातावरण थंड असताना कोमट पाणी प्यावे. जेवतानाही कोमटच पाणी प्यावे. बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने हात, पाय, चेहरा धुवावा .नाक तोंड धुवून गुळण्या करून घसा साफ करावा. गळ्यापासून वर चेहऱ्याला तेल लावून वाफ घ्यावी. ‘नस्य’ हा पंचकर्मातील उपचार घ्यावा. 
     घसा दुखणे- 
      वरीलप्रमाणेच उपाय करावेत. तसेच त्रिफळा काढा, हळदीचा काढा याने दिवसातून ३ वेळा गुळण्या कराव्यात. १-१ चमचा मध ३-४ वेळा चाटावा.
     दमा- 
      दमा हा स्वतंत्र विषय आहे. या रुग्णांनी धूर, धूळ असणारे रस्ते टाळावेत. बाहेर जाण्याआधी दोन्ही नाकपुड्यांना आतून तीळतेल लावावे. चेहऱ्याला रुमाल बांधावा. नियमित नस्य करावे. अंघोळीच्या आधी छातीला तिळतेलाने मालीश करावे. योग्य काळी ‘वमन’ करावे.    
     डोळ्यांचे विकार- 
      दुचाकीवरून जाताना गॉगल वापरावा. डोळ्यात कचरा गेल्यास थंड पाण्याने डोळे धुवावेत. कापसाने स्वच्छ करावेत. तरीही कचरा न निघाल्यास वैद्यांकडे जावे. डोळे चोळू नयेत. डोळे लाल झाल्यास, जास्त पाणी येत असल्यास गुलाबपाण्याने डोळे धुवावेत. गुलाबपाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात. ‘नेत्रतर्पण’ केल्यास डोळ्यांचे विकार बरे होऊन डोळ्यांचे आरोग्य सुधारेल.
मान, पाठ, कंबरदुखी- 
खड्डे, खाच खळगे यातून चालणे, वाहन चालविणे यामुळेही हा त्रास होतो. यामध्ये स्नायू दुखावल्यामुळे त्रास आहे की मणक्याच्या विकारामुळे त्रास आहे हे मूळ कारण जाणून घ्या.  
स्नायू दुखावल्यामुळे त्रास असेल तर वैद्याच्या सल्ल्याने त्या जागेवर स्थानिक स्नेहन, स्वेदन म्हणजे औषधी तेलाने मसाज करून औषधी काढ्याने शेकावे. कटीबस्ती, मन्याबस्ती हे उपचार करावेत. पोटातूनही औषधे घ्यावी लागतात.
मणक्याच्या विकारांमुळे मान, कंबरदुखी असल्यास मानेचे, कंबरेचे काही व्यायाम, योगासने, औषधी तेलाचा मसाज, काढ्याचे शेक घ्यावेत. कटीबस्ती, मन्याबस्ती हे घ्यावेत, औषधी तेल, काढा यांचा बस्ती (एनिमा) घ्यावा. पोटातूनही गुग्गुळकल्पांसारखी औषधे घ्यावी लागतात.
आपले वाहन सुस्थितीत ठेऊन त्याचे शॉक अब्सोर्बर्स नीट ठेवावेत म्हणजे आपल्या मणक्याचे शॉक अब्सोर्बर्स नीट राहतील.
अशा प्रकारे आपण काळजी घेतल्यास व वैद्यांचा सल्ला घेतल्यास हे आजार टाळता येतील.