ऊस
ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, अशी म्हण प्रचारात असली तरी आयुर्वेदानुसार तो मुळापासून औषधी आहे. औषधी गवतांची जी पाच तृणमुळे सांगितलेली आहेत त्यामध्ये ईक्षु म्हणजे ऊसाच्या मुळांचा समावेश केला आहे. ही तृणपंचमुळे थंड, लघवीच्या, किडनीच्या विकारांवर उपयुक्त आहेत. तृणपंचमुळांवर स्वतंत्रपणे नंतर लिहीन. ऊस हा गवताचाच आधुनिक प्रकार (Modified) आहे. ऊसाने महाराष्ट्राचे अर्थकारण आणि राजकारण समृद्ध केले आहे. ऊस हा बुडख्याजवळ जास्त गोड असतो. शेन्ड्याकडे खारट होत जातो. ऊसाच्या मुळांप्रमाणेच ऊसाचा रस अतिशय औषधी आहे. ऊसाचे करवे चावून चोखलेला ऊसाचा रस हा यंत्राने काढलेल्या रसापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. यंत्राने रस काढताना तो स्वच्छ करून, कीड, माती इ. काढून रस काढला जाईल याची खात्री नसते. तसेच ऊसाचा ताजा रस जास्त श्रेष्ठ आहे. ऊसाचा रस बराच वेळ तसाच ठेवला असता हवा, माशा इ. च्या संपर्कामुळे त्यात विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. गोड असूनही सर्वात कमी कॅलरी असणारे हे नैसर्गिक शीतपेय आहे. (आयुर्वेदात स्पर्शाला थंड या अर्था...