मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

नारळ


             आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळास फार महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळाने होते. प्रेमाने (?) रवानगी करायची असेल तरी नारळ  दिला जातो. नारळाची भेट, नारळाचा प्रसाद हे प्रेमाचे द्योतक आहे. नारळाशिवाय पूजेची सुरुवात होत नाही. सुवासिनीची कोठेही जाताना आनंद प्रसंगी किंवा मंगल प्रसंगी नारळाने ओटी भरणे शुभ मानले जाते. नारळाचे संपूर्ण झाड उपयुक्त आहे. नारळाला कल्पवृक्ष मानले आहे. नारळाचे खोबरे, तेल, नारळाचे दूध, नारळातील पाणी याचे खूप उपयोग आहेत. नारळाच्या करवंटीचाही उपयोग होतो. पानांपासून खराटा, झाडू करतात.
        नारळ पचायला थोडे जड आहे, तसेच स्निग्ध, थंड, बलदायक, कफवर्धक, गोड, तहान व पित्तनाशक आहे. कोणत्याही कारणाने अवयव मुरगळला असेल, स्नायू दुखावला असेल तर नारळाचा किस, हळद यांचे मिश्रण गरम करून शेकल्यास ठणका, सूज याला आराम पडतो. नारू, गजकर्ण यावरही याचा उपयोग होतो. नारळाचे तेल केसवर्धक, त्वचा मऊ करणारे आहे. त्वचेच्या सुरकुत्या, डाग, यावर ओल्या खोब-याचे ताजे तेल लावावे.
       उचकी, वांती यावर शहाळ्याचे पाणी व वेलदोडे एकत्र दिल्यास उपयोग होतो. अपचन, मूळव्याध यावरही उपयोग होतो. ओले खोबरे अतिशय पौष्टीक, बलदायक, शुक्रवर्धक आहे. अशक्त लोकांना ओले खोबरे चावून खाण्यास द्यावे.
        देवाच्या करणीचे नारळातील पाणी मधुर, शीत आहे. याने भूक वाढते आणि लघवीचे दोष कमी होतात. शरीरातील जल कमी झाल्यास नारळपाणी द्यावे. 
       करवंटी जाळून त्याचे चूर्ण व मध घेतल्यास भूक लागते. करवंटीच्या राखेत सैंधव व कापूर घालून दात घासल्यास दात व हिरड्या बळकट होतात.
      अशा या कल्पवृक्षाचे स्मरण रहावे म्हणून आपण नारळी पौर्णिमा साजरी करतो.

1 टिप्पणी:

Vijay Shendge म्हणाले...

खुपच उपयुक्त लेख. पण आजकाल हे असलं काही करण्यासाठी लोकांना वेळ नसतो. आणि म्हणूनच थोडं जरी काही झालं तरी माणूस दवाखान्याची पायरी गाठतो.