सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

शरदाचे चांदणे १

          शरदाच्या चांदण्याविषयी साहित्यामध्ये विपुल माहिती आढळते. शरद ऋतूमध्ये निसर्ग मोठा सुंदर भासतो. नुकताच पावसाळा संपल्यामुळे सर्वत्र हिरवळ, फुललेली रंगीबेरंगी फुले, यामुळे सृष्टी नवचैतन्याने नटलेली असते. दिवसा आकाशामध्ये शुभ्र ढग विहार करीत असतात, तर रात्री आकाश स्वच्छ, निरभ्र असते. असे निरभ्र आकाश, चमचमत्या चांदण्या, चंद्र यामुळे पडलेले चांदणे मोठे मनोहर भासते. 
          या सुरुवातीच्या काळात थोडा पाऊस असतो.  परंतु जसेजसे दिवस जाऊ लागतात, तसतसा पाऊस कमी होतो. शरद ऋतूच्या उत्तरार्धात पाऊस जवळजवळ नसतोच. दिवसा हवेतील ऊष्मा वाढू लागतो.
त्यामुळे उकाडा असह्य होतो. 'ऑक्टोबर हीट' म्हणतात ती हीच. रात्री मात्र टिपूर चांदणे पडते. रात्री हवाही थंड, आल्हाददायक असते. म्हणून अशा वेळी रात्री उशिरापर्यंत चांदण्यात शिळोप्याच्या गप्पा रंगायच्या. रात्री चांदण्यात गच्चीवर थंड, आल्हाददायक हवेत शांत झोप लागते. पहाटे मात्र थंडी, दव पडते. दिवसा उकाडा वाढल्याने पावसाळ्यात संचित झालेल्या पित्तदोषाचा प्रकोप शरद ऋतूत होतो. 
          या ऋतूत येते ती 'कोजागिरी पौर्णिमा'. रात्रीच्या वेळी चांदण्यात आटीव आणि घट्ट दुधाचा आस्वाद घ्यावा. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे एक प्रकारचे Get Together च असते. आयुर्वेदानुसार खरे तर असे दुग्धपान या ऋतूत नियमित करावे. दुधामुळे प्रकुपित पित्ताचे शमन होते. पित्त दोषापासून होणारे विकार टाळण्यासाठी 'विरेचन' हे कर्म सांगितलेले आहे. म्हणजे जुलाबाचे औषध देऊन पित्तप्रकोप कमी करणे होय. त्वचेचे विविध विकारही या ऋतूत होऊ शकतात. त्यावर विरेचन तसेच रक्तमोक्षण हेही कर्म सांगितलेले आहे. रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील दूषित रक्त बाहेर काढणे होय. निरोगी व्यक्तींनी शरद ऋतूत नियमित रक्तदान करावे. त्यामुळे रक्ताचा सदुपयोग तर होईलच,  शिवाय रक्तमोक्षण केल्याचे स्वास्थ्य रक्षणाचे फायदेही मिळतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: