वसंत ऋतूतील प्रकृतीची काळजी

           मंडळी, खास आग्रहास्तव ही पोस्ट पुन्हा देत आहोत.


           वसंत ऋतु म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते. सूर्याचे उत्तरायण हळूहळू या ऋतूत सुरु होते. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढते. शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते. वातावरणात थोडीशी उष्णता वाढताच झाडांना, वेलींना नविन पालवी फुटते. नव्या पालवीमुळे सर्व सृष्टी हिरवीगार, प्रफुल्लित, नवचैतन्याने नटलेली भासते. आंब्याला मोहोर येतो. सर्वत्र सुगंधित फुले फुलतात. कोकीळा कुहु कुहु कुंजन करु लागते. अशा प्रकारे सर्व सृष्टीला नवसंजीवन देणारा हा वसंत ऋतु म्हणजे ’ऋतुराज वसंत’ सुरु होतो. 
            वातावरणातील थंडी कमी होऊन उष्णता वाढल्यामुळे हिवाळ्यात निसर्गत: आणि आहार-विहारामुळे संचित झालेला कफदोष द्रवीभूत होतो, त्याचे विलयन होते. त्यामुळे या ऋतूत कफदोषाचे अनेक व्याधी होऊ शकतात. विशेषत: श्वसनमार्गाचे व्याधी जास्त होतात. उदा. सर्दी, खोकला, घसा सुजणे, दमा, तसेच गोवर, कांजिण्या, ज्वर (ताप) यासारखेही व्याधी होतात. या ऋतूत भुकेचे प्रमाण कमी होते. म्हणून पचायला हलके पदार्थ आहारात असावेत. तसेच नविन तयार झालेले धान्य लगेचच खाऊ नये. कारण त्यामुळे कफ दोष वाढतो. एक वर्ष जुने झालेले धान्य सेवन करावे. किंवा अगदीच नाईलाज असेल तर नविन धान्य भाजून घेऊन मग त्याचे सेवन करावे. 
            या ऋतूत सुरुवातीस महाशिवरात्र येते. महाशिवरात्रीला कवठ फळाचे सेवन करतात. खरे तर कवठासारख्या तुरट रसाच्या फळाचे सेवन या ऋतूत नेहमी करावे. या ऋतूत गुढीपाडवा येतो. त्या दिवशी कडुनिंबाची पाने, गूळ, आले, इ. पासून चटणी करतात. ही चटणी कफनाशक, आरोग्यवर्धक आहे. कडुनिंबाची पाने वसंत ऋतूत नियमित खावीत. आहारात हिरव्या पालेभाज्या भरपूर वापराव्यात. पण भाज्या स्वच्छ धुवून वापराव्यात. वांगी, मुळा, लसूण, आले, तसेच मसाल्याच्या पदार्थांचा आहारात वापर करावा. अशा वापरामुळे भुकेचे प्रमाण वाढते. तूप, लोणी कमी खावे. त्याऐवजी तेलाचा वापर करावा. मधाचे नियमित सेवन करावे. त्यामुळे वाढलेला कफ दोष कमी होतो. आले किंवा सुंठ घालून ताक भरपूर प्यावे. दही मात्र अजिबात खाऊ नये. जड, स्निग्ध पदार्थ, गोड पदार्थ, पक्वान्ने, तळलेले पदार्थ या ऋतूत खाऊ नयेत. पचण्यास हलका आहार, तोही कमी प्रमाणात घ्यावा. जेवताना दोन घास कमी खावेत. विशेषतः रात्रीचे जेवण हलके व लवकर घ्यावे. दुपारचेही भोजन माध्यान्हसमयीच घ्यावे. 
            या ऋतूत उकळून गार केलेले पाणी वापरावे. ह्या काळात उन्हाळ्याची चाहूल लागते म्हणून लगेचच माठाचे, फ्रीजचे पाणी, थंड पदार्थ घेण्यास सुरुवात करू नये. सुरुवातीला साधेच पाणी प्यावे. बर्फ, आईस्क्रीम, कुल्फी, शीतपेये घेऊ नयेत. गार पदार्थांचे सेवन हळूहळू वाढवावे. उन्हातून आल्यावर एकदम पाणी पिऊ नये. अल्प वेळाने शांतपणे पाणी प्यावे. या ऋतूत भूक कमी झालेली असते. अशा वेळी खूप पाणी पिल्यास भूक आणखीनच कमी होते. म्हणून भारतीय संस्कृतीत उन्हातून आल्यावर पाणी आणि उष्ण, मधुर गुणाच्या गुळाचा खडा देण्याची प्रथा असे. 
            पंख्याचा वारा अंगावर घेऊ नये. पंखाची दिशा शरीरापासून दूर असावी. उन्हातून आल्यावर लगेच ए.सी. किंवा कूलरमध्ये बसू नये. सकाळी वातावरणात थोडा गारवा असतो. त्यामुळे सकाळी काम करण्यास उत्साह वाटतो. पण दुपारी उन्हामुळे काम करावेसे वाटत नाही. दुपारी आळस भरतो, झोपावेसे वाटते. परंतु दुपारी अजिबात झोपू नये. व्यायाम कमी प्रमाणात करावा. सकाळी लवकर उठून दिनचर्येस सुरुवात करावी. खूप गरम किंवा गार पाण्याने स्नान करू नये. स्नानासाठी कोमट पाणी वापरावे.
            आयुर्वेदाने या ऋतूत 'वमन' हा पंचकर्मांपैकी एक विधी करण्यास सांगितलेला आहे. कफदोषाचे व्याधी होऊ नयेत म्हणून वमन करावे. शरीरातील कफदोष बाहेर काढण्यासाठी उलटीचे औषध दिले जाते. निरोगी व्यक्तींसहित सर्वांनी (अपवाद वगळता) तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली हे वमन कर्म करवून घ्यावे. अंगाला स्नेहन, स्वेदन करवावे. 
            वसंत ऋतूच्या शेवटी  जसजसे उन वाढेल तसतसे हळूहळू  माठाचे पाणी पिणे, पंखा, ए.सी. यांची सवय वाढविण्यास हरकत नाही.
            अशा प्रकारे आपण आहार विहारांचे पालन केल्यास हा ऋतू आपल्या आयुष्याला नवसंजीवनी देणारा ठरेल.      

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड