शनिवार, २६ मार्च, २०११

ऊस

    ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये, अशी म्हण प्रचारात असली तरी आयुर्वेदानुसार तो मुळापासून औषधी आहे.  औषधी गवतांची जी पाच तृणमुळे सांगितलेली आहेत त्यामध्ये ईक्षु म्हणजे ऊसाच्या मुळांचा समावेश केला आहे.  ही तृणपंचमुळे थंड, लघवीच्या, किडनीच्या विकारांवर उपयुक्त आहेत. तृणपंचमुळांवर स्वतंत्रपणे नंतर लिहीन.
    ऊस हा गवताचाच आधुनिक प्रकार (Modified) आहे. ऊसाने महाराष्ट्राचे अर्थकारण आणि राजकारण समृद्ध केले आहे.  ऊस हा बुडख्याजवळ जास्त गोड असतो. शेन्ड्याकडे खारट होत जातो. ऊसाच्या मुळांप्रमाणेच ऊसाचा रस अतिशय औषधी आहे. ऊसाचे करवे चावून चोखलेला ऊसाचा रस हा यंत्राने काढलेल्या रसापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. यंत्राने रस काढताना तो स्वच्छ करून, कीड, माती इ. काढून रस काढला जाईल याची खात्री नसते. तसेच ऊसाचा ताजा रस जास्त श्रेष्ठ आहे. ऊसाचा रस बराच वेळ तसाच ठेवला असता हवा, माशा इ. च्या संपर्कामुळे त्यात विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.
    गोड असूनही सर्वात कमी कॅलरी असणारे हे नैसर्गिक शीतपेय आहे. (आयुर्वेदात स्पर्शाला थंड या अर्थाने शीत हा शब्द वापरला नाही, तर पचनानंतर शरीरात दिसणारा गुणधर्म या अर्थाने आहे.) ऊसाचा रस, शहाळे, लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत, इ. नैसर्गिक शितपेये असताना आपण उगाचच कृत्रिम, हानिकारक शितपेये पितो.
    ऊसाचा रस गोड, पचायला जड, थंड सांगितलेला आहे. बल्य, तत्काळ शक्ती देणारा, तरीही कमी कॅलरी असणारा आहे. वजन कमी करू इच्छिणा-यांसाठी हे उत्तम पेय आहे.  मधुमेह असणा-या व्यक्त्तींना साखरेऎवजी ऊसाच्या रसाचा पर्याय चांगला आहे. मात्र त्यांनी रस प्रमाणात घेणेच उत्तम.
    काविळीवर ऊसाच्या रसाचा खूप उपयोग होतो. रक्तपित्त विशेषत: उन्हाळ्यात घोळाणा फुटणे यावर याचा उपयोग होतो. ऊसाचा रस वृष्य सांगितलेला आहे. तो कामोत्तेजक आहे.
    किडनीचे आजार विशेषत: मूत्राघात म्हणजे मूत्राची निर्मिती कमी होणे, मूत्रकृच्छ्र म्हणजे लघवी साफ न होणे यावर ऊसाच्या रसाचा खूप चांगला उपयोग होतो. ऊसाचा रस मूत्रल आहे, लघवीचे प्रमाण वाढविणारा आहे.
    पंचकर्मातील वमन कर्मासाठी आकंठ पेयपानासाठी इतर पदार्थांप्रमाणेच ऊसाच्या रसाचा उपयोग करतात.   शरीरातील दूषीत कफ वमनामुळे निघून जातो. आयुर्वेदात ऊसाचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत. त्यांचे गुणधर्मही कमी अधिक प्रमाणात वरीलमाणेच आहेत.
    ऊसापासून काकवी, गूळ, साखर, खडीसाखर, मद्य, इ. पदार्थ तयार करतात. त्यांचेही सविस्तर गुणधर्म आयुर्वेदात वर्णिलेले आहेत. त्यांवर स्वतंत्रपणे नंतर लिहीन.
    शीघ्रकोपी, संतापी, साक्षात  पित्तप्रकृती असणा-या भोळ्या शंकराच्या अभिषेकासाठी दुधाप्रमाणेच थंड ऊसाच्या रसाचा का उपयोग करतात हे आता लक्षात येईल.
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: