हसा, पण लठ्ठ होऊ नका !

     'हसा, आणि लठ्ठ व्हा' अशा स्वरूपाची म्हण प्रचारात आहे. हसण्याचा आणि लठ्ठपणाचा कितपत जवळचा संबंध आहे हे माहिती नाही. कारण प्रख्यात विनोदवीर चार्ली चापलीन आणि आचार्य अत्रे यांची व्यक्तिमत्त्वे भिन्न होती. पण लठ्ठपणा हा अनेक रोगांचे मूळ असल्यामुळे तुम्ही भले मनसोक्त हसा, पण लठ्ठ मात्र होऊ नका. 
    आयुर्वेदात आठ प्रकारची निंदनीय शरीरे सांगितलेली आहेत. त्यामध्ये अतिस्थूल शरीर हे निंद्य मानले आहे. आजच्या २१ व्या शतकात तर बैठ्या जीवनशैलीमुळे (आहाराच्या मानाने व्यायाम अल्प प्रमाणात) स्थूलतेचा शाप अनेकांना मिळालेला आहे. गरीब, कष्टकरी वर्ग वगळता अगदी कनिष्ठ मध्यमवर्गापासून ते उच्च वर्गीयांपर्यंत, नवश्रीमन्तांपर्यंत बहुतेकांना अति सकस आणि अति पौष्टिक आहारामुळे स्थूलतेचा विकार जडलेला आढळतो. गोड, थंड, तेलकट, तुपकट पदार्थांचे भरपूर सेवन, वेळी-अवेळी जेवण घेणे, अति प्रमाणात आहार घेणे, रात्री उशिरापर्यंत जड जेवण, पार्ट्या, सतत दुचाकी, चारचाकी वाहनातून प्रवास त्यामुळे व्यायाम तर सोडाच साधे पायी फिरणेही नाही, सकाळी लवकरपासून ते रात्री उशिरापर्यंत कामाच्या वेळा त्यामुळे वाढलेला मानसिक तणाव अशा अनेक वाईट कारणांमुळे स्थौल्य हा आजार जडतो. तारूण्यापर्यंत, ऐन पंचविशीपर्यंत सडसडीत असलेली व्यक्ती नोकरी लागून लग्न झाले की स्थूल होते. दिवसा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, सतत छानछोकीच्या मौजमजेच्या वातावरणात रहाणे, चिंता, काळजी नसणे, तसेच काही जणांना अनुवान्शिकतेमुळे हा आजार होतो. 
    लठ्ठपणाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. कर्करोग होण्याची शक्यता वाढते. 
       कोणतेही काम करण्याचा उत्साह रहात नाही, थोड्या श्रमानेही लवकर दम लागतो. नुसते शरीर मोठे दिसत असले तरी दुर्बल व अशक्त असते. आळस जास्त प्रमाणात असतो. बसून किंवा झोपून रहावेसे वाटते. शरीराला विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येते. घाम जास्त येतो. भूक खूप लागते, त्याचप्रमाणे तहानही खूप लागते. खूप भूक लागल्यामुळे अतिप्रमाणात आहार घेतला जातो. त्या अन्नाचे लवकर पचन होऊन परत भूक लागते. परत आहार घेतला जातो. असे दुष्टचक्र  मागे लागते. त्यामुळे वजन वाढते. 
    अतिस्थूलता हा संतर्पणजन्य रोग सांगितलेला आहे. अतिप्रमाणात पौष्टिक आहार घेणे म्हणजे संतर्पण होय. 
    काही व्यक्तींमध्ये आहारात जास्त प्रमाणात भाताचे सेवन केले असताही स्थूलपणाची प्रवृत्ती प्रत्यक्षात आढळते. 
    एकविसाव्या शतकात हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, यांचा धोका टाळायचा असेल तर स्थूलता हा आजार मानून त्याची अग्रक्रमाने चिकित्सा करणे अत्यावश्यक आहे. 
    स्थूलतेच्या उपचारांविषयी पुन्हा कधी तरी पाहू.         

Comments

Nilima said…
sthultechya upchara sathi kay kay karave krupaya lavkat lavkar post takavi hi aap nas vinanti

dhanyavad

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड