कुळीथ / कुलित्थ (हुलगे)

      हिवाळा आला की शेंगोळे किंवा कुळीथाच्या जिलब्या घरोघर केल्या जातात. कुळीथाचे पिठलेही फार प्रसिध्द आहे. नाशिक, धुळे जिल्ह्यात वरील पदार्थ फार फार प्रसिध्द आहेत. ताकाबरोबर केलेले  कुळीथाचे कालवण खूपच चविष्ट लागते. कुळीथालाच हुलगे तर संस्कृतमध्ये कुलित्थ असे म्हणतात. 
     कुळीथ हे अतिशय उष्ण आहेत. म्हणून कुळीथ फक्त हिवाळ्यात खातात. इतर ऋतूत त्याचा वापर करू नये. तसेच पित्तप्रकृतीच्या माणसांनी याचे जपून सेवन करावे. कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते. अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.
     मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.  
     पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो. पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो. खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा. 
     आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. 
     कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो. 
    उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.   
     

Comments

Popular posts from this blog

हळद

बाभूळ

उपयुक्त वड