सोमवार, २० डिसेंबर, २०१०

औदुंबर (उंबर)

     भगवान दत्तात्रेयांना औदुम्बराचे झाड अतिशय प्रिय आहे. औदुम्बराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचा वास असतो. दत्तजयन्तीच्या वेळी आपण औदुम्बराची पूजा करतो, त्यानिमित्ताने आपण त्याच्या अंगी असणाया गुणांची माहिती घेऊ या.
    पुराणामध्येही अशी एक कथा आढळते की नरसिंव्हाने जेव्हा हिरण्यकश्यपू या राक्षसाचा पोट फाडून वध केला तेव्हा त्याच्या हाताच्या नखान्ची खूप आग व्हायला लागली. त्यावेळी त्याने आपली नखे उंबराच्या झाडात खुपसली, तेव्हा ती आग शान्त झाली. त्यातील कथेचा भाग सोडला तरी उंबर हे अतिशय थंड आहे, हे आपल्या लक्षात येते.
    उंबराच्या झाडाजवळ जमिनीखाली पाणी असते, असे म्हणतात.  उंबराची साल, फळ, चीक, रस, पाने यांचा औषधात वापर करतात.
    उंबर हे पित्तशामक, तसेच तहान भागविणारे आहे. अम्लपित्तावर उंबराची पिकलेली फळे साखरेबरोबर देतात. उष्णतेने अंगाची आग होत असल्यास सालीचे चूर्ण किंवा काढ्याचा उपयोग होतो. रक्तपित्त नावाच्या आजारात याचा चांगला उपयोग होतो. अंगावरून जास्त जाणे या स्त्रियांच्या विकारात फळे, सालीचा काढा घ्यावा. सारखे जुलाब होत असल्यास उंबराचा चीक साखरेतून खावा.
   लहान मुलांच्या गोवर, कांजिण्या यामध्ये होणाऱ्या उष्णतेवर उंबराचा रस किंवा सालीचे चूर्ण मधातून चाटवावे. मुलांच्या नाकातून घोळाणा फुटणे यावर फळांचा उपयोग होतो.
   खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे, सारखी खा खा सुटणे, या भस्मक रोगावर सालीचे चूर्ण किंवा मुळाचे पाणी द्यावे.
  जुन्या उंबराचे मूळ कापून त्याखाली भांडे ठेवावे, म्हणजे त्यामध्ये मुळाचे पाणी साठेल. हे पाणी अतिशय थंड असते. उंबरापासून ’उदुंबरावलेह’ करतात, तो ही थंड आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: